पदयात्रेच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा यांनी साधला मतदारांशी संवाद
By Admin | Updated: October 2, 2014 01:22 IST2014-10-02T01:20:38+5:302014-10-02T01:22:01+5:30
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे.

पदयात्रेच्या माध्यमातून राजेंद्र दर्डा यांनी साधला मतदारांशी संवाद
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांनी पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिला आहे. बुधवारी बारी कॉलनी, अल्तमश कॉलनी, आझाद चौक भागात काढण्यात आलेल्या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी राजेंद्र दर्डा यांनी या भागातील प्रत्येक घरी जाऊन मतदानाचे आवाहन केले.
राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेची सुरुवात हाजी फंक्शन हॉल येथून करण्यात आली. आजच्या पदयात्रेत आ. एम. एम. शेख व त्यांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. राजेंद्र दर्डा व एम. एम. शेख यांच्या उपस्थितीमुळे पदयात्रेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. पदयात्रा ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीने पुढे जात होती.
शेकडो कार्यकर्ते गळ्यात काँग्रेसच्या पताका, हातात तिरंगी झेंडे घेऊन पदयात्रेत सहभागी झाले होते. पदयात्रा पुढे वाहेद कॉलनी, टाकळकर सोसायटीमार्गे बारी कॉलनीत पोहोचली. त्यानंतर अल्तमश कॉलनीत राजेंद्र दर्डा यांनी परिसरातील नागरिकांकडून सत्कार स्वीकारले. याठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक कार्यकर्ते पदयात्रेत सहभागी झाले. पदयात्रा हशमत रहीम चौकात पोहोचल्यानंतर राजेंद्र दर्डा यांनी दुकानदारांशी भेटीगाठी घेऊन मतदानाचे आवाहन केले.
परिसरातील विविध काँग्रेस संपर्क कार्यालयाच्या वतीने राजेंद्र दर्डा यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला व जोमाने कामाला लागण्याचे आवाहन केले. मौलाना आझाद चौकात पदयात्रेचा समारोप करण्यात आला. यावेळी परिसरातील नगरसेवक , काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक व समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
विद्यानगर, न्यायनगरात आज पदयात्रा
राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा आज वॉर्ड क्र. ७० विद्यानगर, ७१ न्यायनगर भागात काढण्यात येणार आहे. सकाळी ८.३० वाजता अण्णांची टपरी विद्यानगर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. पदयात्रेत कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.