आडूळ परिसरातील बंगाली डॉक्टरांनी ठोकली धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:04 IST2021-05-13T04:04:21+5:302021-05-13T04:04:21+5:30
आडूळ : शासकीय आरोग्यसेवा पाेहोचत नसल्याने आडूळ शिवारातील गावागावांत बोगस बंगाली डॉक्टरांची काळी छाया परसली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या ...

आडूळ परिसरातील बंगाली डॉक्टरांनी ठोकली धूम
आडूळ : शासकीय आरोग्यसेवा पाेहोचत नसल्याने आडूळ शिवारातील गावागावांत बोगस बंगाली डॉक्टरांची काळी छाया परसली असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने बुधवारच्या (दि.१२) अंकात प्रकाशित केले. हे वृत्त प्रकाशित होताच परिसरातील बंगाली डॉक्टरांनी गुरुवारी सकाळपासूनच आपली दुकानरूपी दवाखाने बंद करून धूम ठोकली. दुसरीकडे तहसीलदारांनीदेखील वृत्ताची दखल घेऊन तालुका आरोग्य विभागाला चौकशी करण्याचा आदेश दिला, तर आरोग्य विभागाकडून संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला नोटीस देऊन बोगस डॉक्टरांची माहिती देण्यास सांगितले.
कोरोनाच्या काळातही नागरिकांच्या जिवाची पर्वा न करता बोगस बंगाली डॉक्टर सर्रासपणे रुग्णांच्या घरी जाऊन उपचार करीत आहेत. आडूळ, रजापूर, एकतुनी, घारेगाव, गेवराई बु., अंतरवाली खांडी, दाभरूळ, ब्राह्मणगाव, खादगाव, पारुंडी या गावांमध्ये असे प्रकार समोर आले आहेत. आरोग्य विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने या परिसरात तब्बल १४ बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने थाटले आहेत.
बंगाली डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आडूळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडे केली होती; परंतु अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे कारवाईकडे कायमच दुर्लक्ष केले गेले. त्यात तालुका व जिल्हास्तरावरील पथकाकडूनदेखील कधीच कारवाई झाली नाही. हे गंभीर प्रकरण ‘लोकमत’ने उजेडात आणताच वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या बोगस डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून गुरुवारी पळ काढला; परंतु त्यांच्यावर ठोस कारवाईची नागरिक प्रतीक्षा करीत आहेत.
----
आडूळ शिवारात बोगस बंगाली डॉक्टरांनी ठाण मांडल्याचे वृत्त वाचल्यानंतर संबंधित गावातील ग्रामसेवक व सरपंचांना लेखी नोटीस बजावल्या आहेत. गावात असा काही प्रकार घडत असेल, तर तात्काळ वरिष्ठ कार्यालयात लेखी स्वरूपात अहवाल द्यावा, अशा सूचना दिल्या आहेत, तसेच आडूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेंद्र कुलकर्णी या प्रकरणावर लक्ष घालून कारवाई करतील, तशा सूचना त्यांना दिल्या आहेत.
-डॉ. भूषण आगाज, तालुका आरोग्य अधिकारी, पैठण
फोटो कॅप्शन :-
बोगस बंगाली डॉक्टरांनी आपले दवाखाने बंद करून पळ काढला.
बातमीचे पीडीएफ वापरावे
120521\img_20210512_170051.jpg
दवाखाना बंद करून बंगाली डॉक्टराने ठोकली घूम