हजारो भाविकांच्या साक्षीने धर्म संमेलनाला प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 00:05 IST2016-06-10T00:02:58+5:302016-06-10T00:05:02+5:30
औरंगाबाद : ‘हरि बोल’ असा जयघोष करीत हजारो भाविकांच्या साक्षीने विराट धर्म संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली.

हजारो भाविकांच्या साक्षीने धर्म संमेलनाला प्रारंभ
औरंगाबाद : ‘हरि बोल’ असा जयघोष करीत हजारो भाविकांच्या साक्षीने विराट धर्म संमेलनाला गुरुवारी सुरुवात झाली.
हरिकृपा सेवा समितीच्या वतीने श्रीहरी पॅव्हेलियन येथे सायंकाळी ६ वाजता धर्म संमेलनाला सुरुवात झाली.
स्वामी हरिचैतन्य महाप्रभूजी यांनी सांगितले की, परमेश्वराची उपासना पद्धती विविध प्रकारची असून भक्तीचे मार्गही विविध आहेत; परंतु परमेश्वर एकच असून आपण त्याची सर्व लेकरे आहोत. असे असताना आपण आपसात का भांडतो? परमेश्वराने आपल्या नसांमध्ये रक्त दिले आहे. त्या रक्ताला हिंसेने वाया घालवू नका. विचार पंथ आणि संप्रदाय वेगळे असू शकतात, पण धर्म एकच आहे. जो राष्ट्रीयता, नैतिकता, मानवता आणि एकात्म भावनेचा संदेश देतो. परंतु दुर्दैवाने आज धर्माच्या नावाखाली समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होतो आहे, ही निंदनीय बाब आहे, असे म्हणत स्वामीजी पुढे म्हणाले की, धर्म विज्ञान प्रेरित आहे आणि ते एकमेकास पूरक आहेत.
धर्मापासून विज्ञान वेगळे केले तर समाजात ढोंगी पाखंडी, अंधविश्वास आणि रुढी-परंपरावाद वाढीस लागेल. त्याला प्रोत्साहन मिळेल आणि विकासाऐवजी विनाश ओढवेल, समाजातील वाईट आचार-विचार आणि विकारांना दूर सारून धर्मपालन व्हायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
स्वामीजींची दिव्य वाणी ऐकण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने जमले होते. प्रभावी विचार आणि अमूल्य संदेशाने सर्व जण मंत्रमुग्ध झाले होते.