धारूर बनली उद्योगनगरी

By Admin | Updated: April 14, 2015 00:51 IST2015-04-14T00:51:10+5:302015-04-14T00:51:10+5:30

विशाल सोनटक्के , उस्मानाबाद महिलांनी पुढाकार घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील धारुर येथे पहावयास मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे वळलेल्या

Dharatur became a business-oriented industry | धारूर बनली उद्योगनगरी

धारूर बनली उद्योगनगरी


विशाल सोनटक्के , उस्मानाबाद
महिलांनी पुढाकार घेतल्यास काय चमत्कार घडू शकतो, याचा प्रत्यय तालुक्यातील धारुर येथे पहावयास मिळतो. बचत गटाच्या माध्यमातून उद्योगाकडे वळलेल्या या महिला आज पिठाच्या गिरणीपासून स्वस्त धान्य दुकानापर्यंतचा कारभार मोठ्या हिंमतीने सांभाळत आहेत. विशेष म्हणजे अवघ्या २ हजार लोकवस्तीच्या या गावात सुमारे सव्वादोनशेपेक्षा अधिक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहत असून, या महिलांचा त्यांच्या कुटुंबालाही मोठा आधार मिळतो आहे.
उस्मानाबाद तालुक्यातील केशेगावनजीक असलेल्या धारुरमध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ही चळवळ उभारली गेली आहे. सद्यस्थितीत तेथे असलेल्या १६ पैकी सुमारे १४ बचत गटांच्या महिलांनी विविध उद्योग सुरु केले आहेत. जीवन ज्योती दुग्ध विकास महिला मंडळाच्या साळुबाई श्रीमंत रोकडे, मैनाबाई इंद्रजीत रोकडे, सरस्वती उबाळे, मनिषा बापूराव गायकवाड, प्रमोदिनी बिडवे, राणी सुरवसे आदी महिलांनी एकत्रीत येवून दूध संकलन केंद्र सुरु केले आहे. तर भैरवनाथ गटाच्या चंद्रकला वाघमारे यांनी फुटवेअरचे आणि लता वाघमारे यांनी किराणा दुकान उभारले आहे. दिक्षा महिला बचत गटाच्या रंजना गायकवाड, कोमल गायकवाड यांनी पिठाची गिरणी तर सुजाता गायकवाड यांनी या गटाच्या माध्यमातूनच स्वस्त धान्य दुकान चालविण्यास घेतले आहे. संगीता वाघमारे बचत गटाच्या माध्यमातून शिलाईचे दुकान टाकले आहे. याबरोबरच बांगडी विक्री, शेळी पालन, कुक्कुटपालन यासह केळी आणि आंब्याच्या बागाही या महिला अत्यंत समर्थपणे सांभाळत असल्याचे दिसून येते.
जीवन ज्योती गटाच्या महिलांनी दूध संकलन केंद्र सुरु केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थितीत येथे सुमारे १०० लिटर दुधाचे संकलन होत असले तरी येणाऱ्या काळात हा उद्योग वाढेल, असा विश्वास त्यांना वाटतो. केवळ दूध संकलनावरच न थांबता भविष्यात खवा, पनीर, रसगुल्ले, लस्सीसह दुग्ध प्रक्रिया उद्योग सुरु करण्यासाठी या महिलांनी प्रशिक्षणही घेतले आहे. दूधाचे संकलन करताना जनावरांचे गोठे, पाणी, चारा व्यवस्थापन आदीबाबतही त्या इतरांना मार्गदर्शन करीत आहेत. या उद्योगाच्या माध्यमातून बँक व्यवहाराबरोबरच इतर बाबींची चांगली माहिती झाल्याचे सांगत, ग्रामसभेलाही आमची आवर्जून उपस्थिती असते असे या महिलांनी सांगितले. विशेष म्हणजे या गटाच्या महिला गावातील स्वस्त धान्य दुकानही अतिशय कुशलपणे सांभाळत आहेत. पूर्वी गावात रेशन दुकान नव्हते. त्यामुळे १० किमीवरील वाडीबामणी अथवा ७ किमीवर असलेल्या केशेगावला जावे लागत होते. गावात स्वस्त धान्य दुकान सुरु व्हावे, अशी मागणी आम्ही लावून धरली. यासाठी संघर्ष केला. आज बचत गटाच्या माध्यमातूनच आम्ही हे दुकान चालवित असल्याचे सरस्वती उबाळे यांनी सांगितले. बचत गटामुळे आमच्या जीवनाला अर्थ लाभल्याचे सांगत, आज स्वकष्टाने मी माझ्या मुलीला तंत्रनिकेतनच्या अभ्यासासाठी बाहेरगावी ठेवल्याचेही त्या म्हणाल्या.
उबाळे यांच्याप्रमाणेच सुवर्णा धन्यकुमार भोसले या महिलेचीही यशोगाथा आहे. पाच वर्षापूर्वी मजुरी करणाऱ्या या महिलेने २०११ मध्ये तुळजाभवानी गटाच्या माध्यमातून पावणेदोन लाखाचा खर्च करुन लाँड्री टाकली आहे. यासाठी हायड्रो आणि वॉशिंगची यंत्रे खरेदी केली. आज या लाँड्रीकडे तुळजापूरच्या सैनिकी स्कूलमधील विद्यार्थ्यांचे कपडे धुण्याचे टेंडर असून, श्री तुळजाभवानी देवस्थानसह तुळजापुरातील विविध लॉजमधील कपडे धुण्यासाठी टेम्पोने त्यांच्याकडे येतात. पूर्वी तुळजापूरला जाण्यासाठी बसच्या तिकीटाचे ५ रुपये नसायचे. मात्र या उद्योगाच्या माध्यमातून कुटुंब उभे राहिल्याचे सुवर्णा भोसले अत्यंत अभिमानाने म्हणाले.

Web Title: Dharatur became a business-oriented industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.