धोंडी...धोंडी.. पाणी दे!

By Admin | Updated: July 1, 2014 00:37 IST2014-07-01T00:30:48+5:302014-07-01T00:37:37+5:30

नांदेड : मागीलवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर यंदा पावसाअभावी रडकुंडीला येण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

Dhandi ... Dhandi .. give it water! | धोंडी...धोंडी.. पाणी दे!

धोंडी...धोंडी.. पाणी दे!

नांदेड : मागीलवर्षी अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले तर यंदा पावसाअभावी रडकुंडीला येण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसासाठी जिल्ह्यात देवाला साकडे घालण्यात येत आहेत. ‘धोंडी धोंडी पाणी दे’ असे म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली.
पळसा : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांचा सर्वेही करण्यात आला. परंतु शासनाची मदत ही प्रतिष्ठीत व पदाधिकारी कास्तकारांच्या पदरात पडली व गोर-गरीब खऱ्या-खुऱ्या लाभार्थी शेतकऱ्यांचे नावच यादीतून गाळण्यात आले. एकूण जवळपास ७०० श्ोतकऱ्यांपैकी ३४६ शेतकऱ्यांना गारपीटीची नाराजी निर्माण होवून शेतकरी आक्रमकतेच्या पावित्र्यात उभे राहिले. शेतकऱ्यांवरील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी २४ जून रोजी शिवसेना तालुका अध्यक्ष नागेश पाटील आष्टीकर यांच्या नेतृत्वाखाली सभा घेण्यात आली. यामध्ये सरपंच श्रीमती कांताबाई मुळे, डॉ. गजानन कदम, पोलिस पाटील काशिराव मस्के, सुनील पाटील, भगवान कोथळकर, शंकर कदम, पुंडलिकराव मस्के, नामाराव मस्के, बाळू मस्के, चंदु चिंचोलकर, बबू चिंचोलकर (गोपाल), संजय धरमुरे, सुहास चाकोते, गजानन मस्के, तंटामुक्ती अध्यक्ष पुंडलिकराव मस्के, सूर्यकांत चिंचोलकर आदी प्रतिष्ठीत मंडळी उपस्थित होती. गोपाल चिंचोलकर म्हणाले, माझ्या शेताच्या तिन्ही बाजुंच्या शेतकऱ्यांचे नाव यादीत आहे. त्यांच्या शेतात गारपीट झाली व माझे शेत लागूनच असून माझे नाव सुटले कसे? माझ्याच शेतावर गार नाही पडली काय? मधुनच अनेक अन्यायग्रस्त शेतकऱ्यांचे सूर येवू लागले. झालेला सर्वे हा शेत पाहून केला की तोंड पाहून अशा प्रकारच्या प्रश्नांची सरबत्ती उडवू लागले.
जूनच्या शेवटीही उन्हाळा सदृश्य चित्र
शंकरनगर : ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पाऊस पडत राहिला आणि पावसाळ्यात उन्हाळा सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे़
जानेवारी, फेब्रुवारीनंतर उन कडक तापण्याच्या दिवसातच अधून-मधून जोरदार वारे, विजांच्या कडकडाटात पाऊस पडू लागला़ त्यामुळे जमीन तापून जमिनीला फूल आले नाही़ अनेक विहिरी, हातपंप, बोअरचे पाणी कमी झाले आहे़ जून महिन्यात पहिल्या व दुसऱ्या आठवड्यात पेरणी झाली तर मूग, उडीद पिके चांगली येतात़ उशीर झाला तर कडधान्याचे उत्पन्न घटते़ यावर्षीच कडधान्याच्या उत्पनवर विपरीत परिणाम होणारच़
किनवट तालुक्याला दहा कोटींचा फटका
किनवट : कमी पावसाच्या भरवश्यावर शेतकऱ्यांनी २५ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात कापूस या नगदी पिकाची पेरणी केली़ पेरणीनंतर पावसाने कायम डोळे वटारल्याने २० हजार हेक्टरमधील पीक करपण्याच्या मार्गावर आहे़ कापूस पिकाच्या लागवडीपोटी शेतकऱ्यांना ५ कोटी रुपयांच्यावर फटका बसणार आहे़ १७ जूनच्या पावसानंतर पेरलेले ५ हजार ७८० हेक्टरमधील सोयाबीन व २ हजार ८११ हेक्टरमधील तूर बियाणेही शेतकऱ्यांच्या हातून गेल्यात जमा असल्याने शेतकरी हताश बनला आहे़ खरीप हंगाम हातून गेल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे़
मृगनक्षत्रात १७ जून रोजी सर्वदूर पावसाने हजेरी लावली़ त्या भरवशावर व ज्यांच्याकडे पाण्याची सोय आहे, अशा काही शेतकऱ्यांनी २७ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रात २५ जूनपर्यंत कापूस पिकाची पेरणी केली़ तर सोयाबीन २ हजार ७८० हेक्टर क्षेत्रात, तूर २ हजार ८११ हेक्टर क्षेत्रात, ज्वारी ५३० हेक्टर अशी एकूण ३६ हजार ७८१ हेक्टर क्षेत्रात खरीपाची पेरणी झाली़ खरीप हंगामात लागवडीसाठी ७९ हजार ७०० हेक्टर क्षेत्र असताना ३६ हजार ७८२ हेक्टर क्षेत्रात म्हणजे ४६ हेक्टर पेरण्या करून आभाळाकडे डोळे लागलेल्या शेतकऱ्यांना पावसाने दगाच दिला़ परिणामी २० हजार हेक्टर क्षेत्रातील कापूस व सोयाबीन, तूर व ज्वारी बियाणेही वाया गेल्यात जमा आहे़ पावसाअभावी बियाणे व लावलागवडीपोटी केलेला शेतकऱ्यांचा खर्च वाया गेल्याची भीती व्यक्त होत आहे़ कापूस बियाण्यापोटी पाच कोटी तर लावलागवडी पाच कोटी असा दहा कोटी रुपयांचा फटका तूर्त शेतकऱ्यांना बसला आहे़
वरूणराजाची मनधरणी
मांडवी : अडून बसलेल्या वरूणराजाच्या मनधरणीसाठी बळीराजा नवस करत आहे़ तर दुसरीकडे देव-देवतांच्या मूर्तीला आंघोळ घालून मंदिर परिसरात भजन-पारायण, अभिषेक केला जात आहे़
१७ जूनला चांगला पाऊस झाला़ उरले-सुरले सर्वच शेतकरी कापसाची रोपणी करून मोकळा झाला़ पण पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या़ त्यात भर म्हणजे उन्हाचा कहर झाला़ अंकुरलेले बियाणे करपू लागले आहे़ गुरंढोर चारणारी मुले हे कमरेला लिंबाच्या डाहाळ्या बांधून व काठीला बेडूक लटकवून धोंडी-धोंडी पाणी दे म्हणत घरोघरी नाचगाण्याचा प्रयोग करीत आहेत़ हौशी मंडळी त्याच्या अंगावर दोन भांडे पाणी ओतून ओलेचिंब करीत आहेत़ आशेवर जगणारा शेतकरी मात्र आभाळाकडे डोळे लावून चातकाप्रमाणे पाऊस सरी कोसळण्याची वाट पाहत आहे़
चार तलावांत केवळ १५ ते २० टक्के पाणी
हिमायतनगर : तालुक्यातील सवना (ज़), पवना, दूधड, पोटा येथील तलावात केवळ १५ ते २० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे़ त्यामुळे जनावरांना चिखलात जावून पाणी प्यावे लागत आहे़ ३० जूनपर्यंत पाऊस नाही़ शेतातील विहिरीने तळ गाठला आहे़ अनेक बोअर कोरडे पडले आहेत़ ५० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली आहे़ उर्वरित शेतकरी ढगाळ वातावरण पाहून पुन्हा धूळ लागवड करीत आहेत़ अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ जनावरांना चारा उपलब्ध नाही़ तलावात गाळ वाढला असून बेशरमाची झाडे वाढली आहेत़ पाऊस न पडल्याने शेतकरी भंडारा, पंक्ती करीत आहेत़ पाऊस पडावा म्हणून देवाला पाणी टाकणे, प्रार्थना करणे तसेच मुस्लिम बांधवांकडून नमाज अदा करणे, गावात कीर्तन, भजन चालू आहे़
जमिनीमध्ये धगधग, वातावरण कोरडे
जांब: यंदा पाऊस महिनाभराने लांबल्याने पेरण्या खोळंबल्या आहेत़ उशिरा झालेल्या पावसावर कापसाऐवजी सोयाबीनचे पीक तरेल या अपेक्षेने यंदा सोयाबीनचे पेरणीक्षेत्र वाढणार आहे़ यंदा कृषी खात्याचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते़ कारण सोयाबीन बियाणे घेण्यासाठी शेतकरी दुकानावर गेला तर मी गॅरंटी देत नाही म्हणत आहेत़ त्यामुळे शेतकरी पहिल्याच पावसाअभावी सैरवैर झाला़ पुन्हा कर्जाचा डोंगर, त्यात बियाण्याची गॅरंटी देत नाहीत़ त्यामुळे शेतकरी कोणाच्या जिवावर पेरणी करावा या संभ्रमात पडला आहे़ त्यातच दरवर्षी कापसाचे उत्पादन कमी व लागवड तसेच वेचणी खर्च जास्त, त्यामुळे कापसाऐवजी सोयाबीनचे पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे़ दरम्यान याच संधीचा फायदा घेण्यासाठी व्यापारी सोयाबीन बियाणाची जादा दराने विक्री करीत आहेत़ त्यातही कृत्रिम टंचाई निर्माण करून चढ्या दराने विक्री करीत असल्याने चर्चा होत आहे़
पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात
कुंडलवाडी/बारुळ/राजगड : या परिसरात पाऊस लांबल्याने शेतकरी संकटात सापडला आहे़ किमान आर्द्रा नक्षत्रात तरी पाऊस पडावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे़
राजगड परिसरातील राजगडतांडा, राजगड गाव, नीचपूर, कनकवाडी, मारेगाव, बेल्लोरी, पांध्रा, सिंदगी, मोहपूर आदी गावातील ८० टक्के शेतकऱ्यांनी मृगाच्या भरवशावर कापसाची लागवड केली होती़ मृग कोरडा गेला़ कुंडलवाडी परिसरातील शेतकरीही अस्वस्थ आहेत़ पिण्यासाठी पाणी मिळणार नाही, असे बाबुराव खैराते, चंदा रेड्डी गोदलवार, नरसिमलू ब्यायलवार, शंकर पाटील या शेतकऱ्यांनी सांगितले़ बारूळ परिसरात कौठा, कलंबर, पेठवडज, चिंचोली, मंगलसांगवी, नंदनवन, औराळ, बाचोटी, चिखली, हळदा आदी गावांतील शेतकऱ्यांनी महागामोलाची बी-बियाणे खरेदी करून पेरणी केली होती़

Web Title: Dhandi ... Dhandi .. give it water!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.