धनगर समाजाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
By Admin | Updated: August 13, 2014 01:07 IST2014-08-13T00:47:09+5:302014-08-13T01:07:28+5:30
लातूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी लातूर जिल्हा

धनगर समाजाचा जिल्हा कचेरीवर मोर्चा
लातूर : धनगर समाजाच्या अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची अंमलबजावणी करून तात्काळ अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे या मागणीसाठी लातूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला़ मोर्चात मोठ्या प्रमाणात समाजबांधव सहभागी झाले होते़ आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने राज्य शासनाच्या विरोधात आंदोलनकर्त्यांनी घोषणा दिल्या़
भारतीय राज्य घटनेने धनगर समाजाला ६० वर्षांपूर्वीपासून अनुसुचित जमातीत समाविष्ट केले आहे़ धनगर व धनगड एकच असल्याचे राज्य व केंद्र शासनाचे अनेक पुरावे असतांनाही गेल्या ६० वर्षांपासून प्रत्येक वेळी धनगर व धनगड हे वेगळे दाखवून महाराष्ट्र शासनाने धनगर समाजाला अनुसुचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला़ शासनाने अनुसूचित जमातीच्या सवलतीपासून वंचित ठेवल्याने समाजाचा सर्वांगीण विकास खुंटला आहे़ त्यामुळे राज्यभर समाजात असंतोष पसरला आहे़ मोर्चात समाजबांधवांनी आरक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारचा निषेध केला़ तसेच राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली़ डॉ़ बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा काढण्यात आला़ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली़ धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा लाभ द्यावा, तसेच अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी लातूर जिल्हा धनगर समाज आरक्षण कृती समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली़ मोर्चात अॅड़ अण्णाराव पाटील, श्रीरंग शेवाळे, रामराव माने, बाळासाहेब होळकर, शिवाजी सुरवसे, महिंद्रनाथ भादेकर, राजपाल भंडे, गणेश हाके, अॅड़ मंचकराव डोणे, सुभाषराव लवटे, गोरोबा गाडेकर आदींचा सहभाग होता.