धमाल मस्ती, संवादाबरोबरच ‘श्रमसंस्कारा’चे धडे
By Admin | Updated: March 4, 2017 16:50 IST2017-03-04T16:50:44+5:302017-03-04T16:50:44+5:30
राष्ट्रीय सेवा योजना शिबीर : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासातही पडतेय भर

धमाल मस्ती, संवादाबरोबरच ‘श्रमसंस्कारा’चे धडे
ऑनलाइन लोकमत/ सोमनाथ खताळ
औरंगाबाद, दि. 4 - धमाल मस्ती... धिंगाणा... शिट्या अन् टाळ्यांचा कडकडाट एखाद्या कार्यक्रमातच होतो, असे नाही, तर असा अनुभव आता ग्रामीण भागातील जनतेला येऊ लागला आहे अन् तो राष्ट्रीय सेवा योजना या शिबिराच्या माध्यमातून. ज्या महाविद्यालयाने रासेयो शिबीर अयोजित केले आहे, त्यातील स्वयंसेवक विद्यार्थी विविध कार्यक्रमांतून समाजप्रबोधन आणि मनोरंजन करीत आहेत. याला ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. एवढ्यावरच न थांबता हे स्वयंसेवक ग्रामस्थांसोबत संवाद साधून विविध विषयांवर जनजागृती करीत आहेत. या शिबिरातून विद्यार्थी श्रमसंस्काराचे धडे गिरवत असून, त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात भर पडत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांचे राष्ट्रीय सेवा योजना विभागांतर्गत (एनएसएस कॅम्प) ‘जल संवर्धनासाठी युवा’ असे सात दिवसांचे विशेष निवासी शिबीर घेतले जाते. यामध्ये संबंधित महाविद्यालय एक गाव निवडते आणि त्या गावात श्रमदान करण्याबरोबरच विविध कार्यक्रम घेतले जातात. सकाळी ५ वाजेपासून विद्यार्थी कामाला लागतात. कुठल्या वेळेत काय करायचे, याचे चोख नियोजन कार्यक्रम अधिकारी करतात. यामध्ये योगासने, व्यायाम, प्राणायाम, मानसिक आरोग्य, सामाजिक आरोग्य, राष्ट्रीय एकात्मता, जलव्यवस्थापन, धर्मनिरपेक्षता, शासकीय योजनांची माहिती, सामाजिक जागृतीबरोबरच श्रमदानाचाही समावेश आहे. तसेच याअंतर्गत स्वयंसेवक विद्यार्थी ग्रामीण समस्या जाणून घेतात. हे स्वयंसेवक लोकसहभागातून या समस्यांचे निरसन करण्याचे प्रयत्न करतात. यामुळे संबंधित गावांच्या वैभवात भर पडत आहे.
का राबवले जाते हे शिबीर?
महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच समाजसेवा करणे, आपल्या जवळपासच्या परिसरातील लोकांमध्ये मिसळून त्यांना समजून घेऊन रचनात्मक कार्य करणे, समाजसेवेच्या माध्यामातून स्वत:च्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करण्याच्या दृष्टीने राष्ट्रीय सेवा, स्वावलंबन, चारित्र्यसंवर्धन व सामाजिक बांधिलकी या मूल्यांचा समन्वय नवीन शिक्षण पद्धतीत घडवून आणण्यासाठी महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षापासून २४ सप्टेंबर १९६९ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय सेवा योजना भारत सरकारच्या युवा, कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत राबवण्यात येत आहे.
या महाविद्यालयांचाही असतो सहभाग
औरंगाबाद शहरातील एमआयटी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, छत्रपती महाविद्यालय, देवगिरी महाविद्यालय, जेएनईसी इंजिनिअरिंग महाविद्यालय, एमजीएम वृत्तपत्रविद्या व जनसंवाद महाविद्यालय, सरस्वती भुवन महाविद्यालयांनीही गतवर्षी आणि यावर्षी सामाजिक विषयांवर जनाजागृती करण्यावर भर दिला आहे. संवाद साधण्याबरोबरच मनोरंजनात्मक कार्यक्रमातून प्रबोधन करण्यास महाविद्यालयांनी अधिक पसंती दिल्याचे दिसून येते.
शौचालय बांधण्यासाठी ‘डोअर टू डोअर’ संवाद
एमजीएम वृत्तपत्र व जनसंवाद महाविद्यालयाचे या वर्षीचे शिबीर टेंभापुरी (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच विविध गुणदर्शन सादर केले. मनोरंजनात्मक कार्यक्रमांना ग्रामस्थांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमांतून समाजप्रबोधन तर केलेच, शिवाय दिवसभर डोअर टू डोअर जाऊन ग्रामस्थांना शौचालय बांधण्याचे आवाहन केले. त्यांच्याशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या. या समस्यांचे निरसन त्यांनाच सोबत घेऊन करण्यात आले. तसेच स्वच्छताही करण्यात आली, याला ग्रामस्थांकडून अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाल्याचे प्राचार्य डॉ. रेखा शेळके, कार्यक्रमाधिकारी डॉ. आशा देशपांडे यांनी सांगितले.
बीडच्या अनाथालयालाही मिळाला ‘सहारा’
गेवराई (जि. बीड) येथील सहारा अनाथालयात औरंगाबादच्या जेएनईसी आणि एमआयआयटी महाविद्यालयाचे शिबीर घेण्यात आले. यामध्ये स्वयंसेवकांनी येथील अनाथ, उपेक्षित मुलांना सोबत घेऊन काम केले. त्यांना मार्गदर्शनही केले. एवढेच नव्हे, तर या अनाथालयाकडे जाणारा रस्ताही टकाटक करून देण्यात आला. परिसरात लावलेल्या झाडांना कुंपण करण्यात आले, तर नवीन झाडांसाठी खड्डे खोदण्यात आले. सात दिवस चाललेल्या या शिबिरामुळे आम्हाला भरपूर आधार मिळाल्याचे सहाराचे संचालक प्रीती व संतोष गर्जे यांनी सांगितले. तर एमआयआयटीचे कार्यक्रमाधिकारी त्रीशुल कुलकर्णी म्हणाले, आश्रमात उभारणाऱ्या इमारतीसाठी लागणारे खड्डेही विद्यार्थ्यांनी श्रमदाणातून खोदले आहेत. यासाठी प्राचार्य डॉ.संतोष भोसले यांनी मार्गदर्शन केले.