श्रींच्या स्वागताला भक्त सज्ज
By Admin | Updated: August 29, 2014 01:30 IST2014-08-29T00:54:00+5:302014-08-29T01:30:58+5:30
परभणी: शुक्रवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून गणरायाच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गणेशभक्तांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. गणेश मंडळाचे पदाधिकारी स्टेज

श्रींच्या स्वागताला भक्त सज्ज
परभणी: शुक्रवारपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होत असून गणरायाच्या आगमनाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी गणेशभक्तांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. गणेश मंडळाचे पदाधिकारी स्टेज उभारणीमध्ये व्यस्त आहेत. तर दुसरीकडे शहराच्या बाजारपेठेत आकर्षक गणेशमूर्ती आणि सजावटीचे साहित्य दाखल झाले आहे.
प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पावसाचे पुनरागमन झाल्यामुळे सगगळीकडेच उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सव काळात पाऊस येणार, असा अंदाज बांधला जात होता. तो प्रत्यक्षात खरा ठरल्याने ग्रामीण भागात आनंदी वातावरण आहे. दरम्यान, ऊर्जा आणि उत्साहाचे प्रतिक म्हणून समजल्या जाणाऱ्या अद्यदेवता गणरायाचे यावर्षी उत्साहात स्वागत होताना दिसत आहे.
गणेशोत्सव काळात हा उत्साह दहा दिवस चालणार आहे. २९ आॅगस्टपासून या स्फुर्तीदायक देवतेचे आगमन होत असून श्रींच्या स्वागतासाठी गणेशभक्तांनी मागील महिनाभरापासून तयारी सुरु केली आहे. शहरासह जिल्ह्यातील खेडोपाडी गणेश मंडळांची स्थापना झाली असून श्रींची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. ग्रामीण भागात ‘एक गाव एक गणपती’ संकल्पना उदयास आली आहे.
शहरी भागात विविध गणेश मंडळे वेगवेगळ्या पद्धतीचे उपक्रम साजरे करतात. गेल्या काही वर्षात सामाजिक उपक्रमांना प्राधान्य दिले जात आहे. गणेशोत्सव काळात विविध आकर्षक देखावे तयार करण्याची स्पर्धा विविध मंडळांमध्ये लागलेली असते. (प्रतिनिधी)
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तगडा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे. २९ आॅगस्ट ते ८ सप्टेंबर या काळात हा पोलिस बंदोबस्त असेल. या काळातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी लातूर जिल्ह्यातून दोन पोलिस उपाधीक्षक, नाशिक येथील महाराष्ट्र पोलिस अकादमी येथील दहा परिवेक्षाधीन पोलिस अधीक्षक, नागपूर येथील महाराष्ट्र पोलिस प्रशिक्षण केंद्रातील २५ महिला पोलिस कर्मचारी, लातूर पोलिस प्रशिक्षण केंद्रातील ७५ महिला पोलिस कर्मचारी, हिंगोली येथील सशस्त्र राखीव बलाची एक तुकडी (१२० कर्मचारी व तीन अधिकारी), परभणी जिल्हा पोलिस दलातील ८० टक्के महिला व पुरुष पोलिस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. त्याच प्रमाणे दोन आरसीपी प्लाटून, क्युआरटीचे एक पथक, बॉम्ब शोधक व नाशक पथक, स्थानिक गुन्हा अन्वेषण, जिल्हा विशेष शाखेतील साध्या वेशातील बंदोबस्त, रणरागिणी पथक, ७०० पुरुष व १०० महिला होमगार्ड बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत.गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर १ हजार ३१६ व्यक्तींविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत असून समाजकंटकांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचे २० प्रस्ताव आहेत. गणेशोत्सव काळात उपद्रव होणार आहे, अशा १४७ समाजकंटाकावर प्रतिबंध घालण्यात येणार आहे. तसेच सामाजिक शांतता व सुव्यवस्था बिघडविणाऱ्याविरुद्धही कारवाई करण्यात येणार आहे. पोलिस अधीक्षक अनंत रोकडे, अप्पर पोलिस अधीक्षक नियती ठाकर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस बंदोबस्त सज्ज ठेवल्याची माहिती देण्यात आली.