मुंबईच्या भाविकाचा तुळजापूरात मृत्यू
By Admin | Updated: August 22, 2015 23:56 IST2015-08-22T23:50:27+5:302015-08-22T23:56:49+5:30
तुळजापूर : मुंबई येथील देवी भाविक अमोल जाधव या तरुणाचा श्री तुळजाभवानी मंदिरात अभिषेकास गेला असता अचानकपणे चक्कर येवून दुर्दैवी अंत झाला.

मुंबईच्या भाविकाचा तुळजापूरात मृत्यू
तुळजापूर : मुंबई येथील देवी भाविक अमोल जाधव या तरुणाचा श्री तुळजाभवानी मंदिरात अभिषेकास गेला असता अचानकपणे चक्कर येवून दुर्दैवी अंत झाला. सदरची घटना शनिवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
कांदिवली मुंबई येथील तरुण अमोल कारभारी जाधव ( वय ३२) हा आपल्या सहा मित्रासमवेत शुक्रवारी रात्री ८ वाजता खाजगी वाहनाने देवी दर्शनासाठी तुळजापूर येथे आला होता. रात्री देवीचे दर्शन घेवून अक्कलकोटला जाण्याची तयारी केली. परंतु अक्कलकोटला जाण्यास खूप उशिर होईल म्हणून पुजारी गंगाराम यांच्या मदतीने सर्वांनी एका खाजगी लॉजमध्ये मुक्काम केला. सकाळी सर्वजण मिळून मंदिरात देवीच्या अभिषेकासाठी गेले. थोडावेळ अभिषेक मंडपातील रांगेत थांबल्यानंतर अमोल यांनी आपल्यास अस्वस्थ वाटत आहे असे सांगून उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांस बाथरुम कोठे आहे असे विचारले. कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या ठिकाणी अमोल गेला. त्याचवेळी त्यास चक्कर येवून तो खाली कोसळला. सदर बाब सुरक्षा रक्षकाच्या लक्षात येताच त्यांनी त्यास तात्काळ उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यास मृत घोषित करण्यात आले. सदर माहिती त्याच्या मित्रांना पुजाऱ्यामार्फत कळविण्यात आल्यानंतर त्यांनी रुग्णालयात धाव घेतली व मित्राचा अकस्मित मृत्यू झाल्याचे पाहून टाहो फोडला. मित्रांचा जबाव नोंदवून घेतल्यानंतर अमोलच्या भावालाही तुळजापूरला बोलाविण्यात आले. दुपारी शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मयत अमोल याच्या पश्चात आई, वडील, भाऊ, बहिण, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे. अमोल हा कांदिवली येथे गुत्तेदारी व्यवसाय करीत असल्याचे समजते. याप्रकरणी तुळजापूर ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद झाली. (वार्ताहर)