देवळाई वनोद्यान विकासासाठी मुहूर्त ठरेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 14:02 IST2017-08-05T13:55:21+5:302017-08-05T14:02:29+5:30
देवळाईच्या वनोद्यानासाठी शासनाकडून २ कोटींच्या आसपास निधी उपलब्ध आहे; परंतु अद्याप येथील खेळणी, दिवे दुरुस्ती व इतर किरकोळ कामे करण्यासाठी शासनाकडून अद्याप यास मंजुरी आलेली नाही. यंदाच्या वर्षात उद्यानाची अवस्था सुधारून पर्यटकांना कसे वनोद्यानाकडे आकर्षित करता येईल, यावर विचारमंथन सुरू आहे.

देवळाई वनोद्यान विकासासाठी मुहूर्त ठरेना
ऑनलाईन लोकमत / साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद : सातारा-देवळाईत वन विभागाचे रोपवन मोठ्या प्रमाणात असून, सारोळा व देवळाई या दोन्ही रोपवनाला वनोद्यान घोषित करण्यात आले. सारोळा वनोद्यान नावारूपाला आले; परंतु शहरालगत हिरव्यागार निसर्गाची मोहिनी घालणा-या देवळाई वनोद्यानाकडे वन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे, त्यामुळे उद्यानाची अवस्था बकाल झाली आहे.
सातारा-देवळाई परिसरात एकही उद्यान नसल्याने शहरातील मनपाच्या उद्यानात लहान मुलांबरोबरच पालकही ‘रविवारी विरंगुळा’ म्हणून येथे येतात. निसर्गरम्य असे देवळाई वनोद्यान असून, विविध खेळणी मुलांसाठी उभारण्यात आल्याने निसर्ग सहलींची झुंबड असते; परंतु देखरेखीकडे फारसे लक्ष वन विभागाने न दिल्याने उद्यानाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांत मुले, ज्येष्ठ मंडळींचा सहभाग असतो. येथे उद्यान क्षेत्रात सौर दिव्यांची रांग लावण्यात आल्याने सायंकाळी निसर्ग उजळून निघत होता; परंतु सौर दिव्यांच्या बॅट-या गायब झाल्याने सध्या अंधार आहे. सध्या खेळणीची अवस्था अत्यंत वाईट झाली असून, खेळताना मुलांच्या हातापायाला दुखापत होत आहे. विविध शाळांच्या निसर्ग सहलीनेदेखील आता याकडे पाठ फिरविली आहे.
उद्यानाला संरक्षक कुंपण...
देवळाई उद्यानाला वन विभागाचे संरक्षक कुंपण असून, सुसज्ज अवस्थेत आणण्यासाठी उद्यानातील खेळणी बदलणे, सौर दिव्यांची दुरुस्ती, इतरही आकर्षणाचे साहित्य उद्यानात बसवण्याची गरज आहे. देवळाई रोडने पुढे कचनेर, सिंदोन, भिंदोन, परदरी, तसेच विविध तांड्यांचा परिसर जोडलेला आहे. वन विभागाने कर्मचा-यांची संख्या वाढवून देखरेख समिती पुन्हा कार्यान्वित करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. रोपवाटिका असताना रोपवन अत्यंत चांगले बहरले होते. सध्या येथील विविध साहित्यांची मोडतोड झाली असून, सौर दिव्यांच्या बॅट-या गायब झाल्याने अंधार आहे.
सारोळ्यासारखे विकसित का होऊ नये...
सारोळा व देवळाई वनोद्यान हे एकाच वेळी वन विभागाने तयार केले. सारोळ्याने पर्यटकांची गर्दी ओढली; परंतु देवळाई शहराच्या अगदी कुशीत असले तरी त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. उद्यानात खेळणी व सौर दिव्यांमुळे परिसर उजळून निघाला होता, त्यामुळे या ठिकाणी कुटुंबासह आलेल्या पालकांना मुलांच्या आग्रहास्तव काही वेळ थांबता येत होते; परंतु सध्या बकाल अवस्था पाहून एकट्या व्यक्तीचेदेखील पाऊल उद्यानाकडे वळत नाही. मद्यप्राशन करणा-यांच्या बैठका मात्र येथे दिसत आहेत. त्यावर निर्बंध घालण्यासाठी कर्मचारी संख्या वाढवून उद्यान विकसित करून देवळाईलादेखील सारोळ्यासारखे वैभव प्राप्त करून द्यावे, अशी मागणी माजी सरपंच करीम पटेल यांनी केली आहे.
उद्यानासाठी निधी उपलब्ध; कामांना मजुरी नाही...
देवळाईच्या वनोद्यानासाठी शासनाकडून २ कोटींच्या आसपास निधी उपलब्ध आहे; परंतु अद्याप येथील खेळणी, दिवे दुरुस्ती व इतर किरकोळ कामे करण्यासाठी शासनाकडून अद्याप यास मंजुरी आलेली नाही. यंदाच्या वर्षात उद्यानाची अवस्था सुधारून पर्यटकांना कसे वनोद्यानाकडे आकर्षित करता येईल, यावर विचारमंथन सुरू आहे. सातारा-देवळाई परिसरात दोन वेगवेगळे रोपवन आहे. विविध ठिकाणी पाणवठे, घनदाट झाडी असल्याने मोर, इतर विविध प्र्रकारचे पक्षी, हरिण, रानडुकरे आहेत. उपलब्ध निधीमधून देवळाई उद्यान विकसित करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत, असे वन परिक्षेत्र अधिकारी शशिकांत तांबे यांनी सांगितले.
पर्यटन वाढविण्यासाठी प्रयत्न हवेत
शहरालगत असलेल्या या वनोद्यानात सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्यास सातारा-देवळाईतील नागरिकांना विरंगुळा होईल. आबालवृद्धांनाही उद्यानाचा आनंद घेणे शक्य होईल, असे या परिसरातील सोमीनाथ हिवाळे म्हणाले.
विद्यार्थी सहलींनी फिरविली पाठ
या उद्यानास सुरुवातीला विविध शाळांच्या निसर्ग सहलींनी भेट देण्याचे प्रमाण वाढले होते. धार्मिक स्थळामुळे दर्शनासाठी आलेले भक्तही या उद्यानास भेट देत होते. दुर्लक्षामुळे आता इकडे कुणी फिरकत नाही, अशी खंत प्रकाश केशरभट या विद्यार्थ्याने व्यक्त केली.