देवळाई 68,सातारा 49%

By Admin | Updated: April 18, 2016 01:31 IST2016-04-18T01:26:05+5:302016-04-18T01:31:44+5:30

औरंगाबाद : महापालिकेच्या देवळाई (वॉर्ड क्र.११४) आणि सातारा (वॉर्ड क्र. ११५) वॉर्डात वादावादीच्या किरकोळ घटना वगळता रविवारी शांततेत मतदान झाले.

Devlaai 68, Satara 49% | देवळाई 68,सातारा 49%

देवळाई 68,सातारा 49%

औरंगाबाद : महापालिकेच्या देवळाई (वॉर्ड क्र.११४) आणि सातारा (वॉर्ड क्र. ११५) वॉर्डात वादावादीच्या किरकोळ घटना वगळता रविवारी शांततेत मतदान झाले. देवळाईत ६८ टक्के, तर साताऱ्यात ४९ टक्के मतदान झाले. रखरखत्या उन्हाचा परिणाम मतदानावर झाला. यादीतून नावे वगळल्याने अनेकांना मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहावे लागले. सातारा आणि देवळाईत २९ केंद्रांवर मतदान झाले. याबरोबरच ११ उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले. महापालिकेत समावेश झाल्यानंतर दोन्ही वॉर्डांची ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण शहराचे लक्ष या निवडणुकीकडे लागले होते. राजकीय पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.
वॉर्ड क्रमांक ११४ मध्ये काँग्रेसचे उमेदवार राजूकाका नरवडे, शिवसेनेचे उमेदवार हरिभाऊ हिवाळे, भाजपचे उमेदवार अप्पासाहेब हिवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नामदेव बाजड यांच्यासह चार अपक्ष रिंगणात होते, तर वॉर्ड क्रमांक ११५ सातारा येथील सेनेच्या उमेदवार पल्लवी गायकवाड, काँग्रेसच्या उमेदवार सायली जमादार, भाजपच्या उमेदवार सुरेखा बावस्कर यांच्यात तिरंगी लढत झाली.
पोलिसांची तत्परता
न्यू इंग्लिश स्कूल येथील मतदान केंद्रावर भाजप, शिवसेना व काँग्रेसच्या उमेदवारांत शाब्दिक चकमकी झडल्या. पक्षांच्या घोषणा कार्यकर्त्यांनी दिल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला. पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेले रुमाल गळ्यात बांधून केंद्रांच्या परिसरात फिरणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे किरकोळ वाद झाले; परंतु पोलिसांनी मध्यस्थी करून वादावर पडदा टाकला.
असा वाढला टक्का
दोन्ही वॉर्डात सकाळी साडेअकरापर्यंत १७ टक्केच मतदान झाले होते. केंद्रांवर मतदारांची कमी आणि पदाधिकारी, कार्यकर्त्यांचीच जास्त गर्दी असल्याचे चित्र होते. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्वच उमेदवार त्यानंतर कामास लागले. उन्हामुळे घराबाहेर पडत नसलेल्या मतदारांसाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली. परिणामी दुपारनंतर मतदानाचा वेग वाढला.
देवळाईत मतदान कासवगतीने
देवळाईत मतदान केंद्र क्र. आठवर मुस्लिम मतदारांच्या मतदान प्रक्रियेत हेतुत: विलंब केला जात असल्याचा आरोप माजी सरपंच करीम पटेल, हकीम पटेल, माजी पंचायत समिती सदस्य समद पटेल यांनी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदानासाठी एका मतदाराला १५ ते २० मिनिटे लागत होती. त्यामुळे हेतुपुरस्सर विलंब करून मतदानात खोडा केला जात असल्याचे आरोप झाले. सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, सहायक निवडणूक अधिकारी मोहीयुद्दीन काजी तात्काळ यांनी घटनास्थळी धाव घेतली. मतदानासाठी वाढीव कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याने प्रक्रिया जलद झाली.
‘राजा’च्या दिमतीला वाहने
भर उन्हात मतदार राजा मतदानासाठी घराबाहेर पडावा, यासाठी सर्वच उमेदवारांनी जोरदार प्रयत्न केले. मतदारांना घरापासून केंद्रात आणणे व परत नेऊन सोडण्यासाठी दोन्ही वॉर्डांत वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आॅटोरिक्षा, व्हॅन, कार यांचा यासाठी वापर करण्यात आला. हक्काचे मतदान करून घेण्यासाठी सर्वच उमेदवारांनी परिश्रम घेतले. हौसिंग सोसायटी, जुन्या गावातील मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी उमेदवार व त्यांच्या समर्थकांची दिवसभर लगबग सुरू होती.
आज मतमोजणी
भाजप, शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या सातारा- देवळाई वॉर्डांची मतमोजणी सोमवारी होणार आहे. बीड बायपास रस्त्यावरील ‘एजीपी’ शाळेत सकाळी दहा वाजता मतमोजणीस प्रारंभ होईल. सात टेबलवर मतमोजणी होणार असून, साडेअकरा वाजेपर्यंत निकाल हाती येतील, अशी शक्यता निवडणूक निर्णय अधिकारी पांडुरंग कुलकर्णी यांनी व्यक्त केली.
मतदार यादीतील नाव गायब झाल्याने शेकडो मतदारांना मतदानाचा हक्क बजावता आला नाही. लोकसभा, विधानसभेत मतदान केल्यानंतरही महापालिकेच्या निवडणुकीत नावे कशी गायब झाली, याचा जाब मतदार विचारत होते. त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची तारांबळ उडत होती.
रस्त्यांवर शुकशुकाट
औरंगाबाद : शहरातील तापमानाने ४१ अंश सेल्शिअसचा टप्पा गाठला आहे. शहरातील तापमान रविवारी ४०.२ अंशांवर स्थिरावले; परंतु उष्णतेच्या तीव्र झळांनी जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यामुळे रस्त्यांवर दुपारच्या वेळी शुकशुकाट दिसून येत आहे.
एप्रिलच्या सुरुवातीलाच तापमान ४० अंशांवर पोहोचले होते. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ४१ अंशांपर्यंत आला. शनिवारी तापमान ४१.२ अंशांवर आले; परंतु रविवारी ४०.२ अंश सेल्शिअस तापमानाची नोंद झाली. परंतु उन्हाच्या झळांनी सर्वसामान्य हैराण होत आहे. एप्रिल हिटने शहरवासीय घामाघूम होत असून अजून मे महिना पूर्ण बाकी आहे. त्यामुळे नागरिकांना रणरणत्या उन्हाला सामोरे जावे लागणार असल्याचे दिसत आहे.
देवळाईत मतदान कासवगतीने
देवळाईत मतदान केंद्र क्र. आठवर मुस्लिम मतदारांच्या मतदान प्रक्रियेत हेतुत: विलंब केला जात असल्याचा आरोप माजी सरपंच करीम पटेल, हकीम पटेल, माजी पंचायत समिती सदस्य समद पटेल यांनी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मतदानासाठी एका मतदाराला १५ ते २० मिनिटे लागत होती. त्यामुळे हेतुपुरस्सर विलंब करून मतदानात खोडा केला जात असल्याचे आरोप झाले. सहायक पोलीस निरीक्षक प्रिया थोरात, सहायक निवडणूक अधिकारी मोहीयुद्दीन काजी तात्काळ यांनी घटनास्थळी धाव घेतली.
3 मतदानासाठी वाढीव कर्मचाऱ्यांची तातडीने नियुक्ती करण्यात आल्याने प्रक्रिया जलद झाली.
दोन्ही वॉर्डांत नेत्यांच्या वाहनांचा धुराळा
औरंगाबाद : सातारा आणि देवळाई या दोन्ही वॉर्डांच्या पोटनिवडणुकीत मतदार बाहेर काढता-काढता उमेदवार आणि कार्यकर्त्यांची पुरती दमछाक झाली, तर उन्हामुळे अवसान गळालेले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविण्यासाठी सर्व पक्षाच्या नेत्यांच्या वाहनांचा धुराळा दोन्ही वॉर्डांत उडाला. मतदानाची वेळ संपल्यानंतर या सगळ्या राजकीय गर्दीतून सुटका झाल्याचा नि:श्वास मतदारांनी टाकला.
मागील १५ दिवसांपासून दोन्ही वॉर्डांत राजकीय धुमशान-तुफान सुरू होते. दोन्ही वॉर्डांत रविवारी काही तुरळक घटना वगळता शांततेत मतदान झाले. शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सातारा-देवळाई निवडणुकीपुरतेच शहरात काम होते. इतरत्र कुठेही निवडणुका नसल्यामुळे त्या दोन वॉर्डांत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांची धूम होती. निवडणुकीच्या प्रचारात रोज कोणत्या न कोणत्या पक्षाच्या पदयात्रा, सभांंचे आयोजन झाल्यामुळे मतदारही संभ्रमात होते. दोन्ही वॉर्डांत मिळून २९ बुथवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. उन्हामुळे मतदार बाहेर पडलेच नाहीत. सायंकाळच्या टप्प्यात ऊन कमी झाल्यानंतर साताऱ्याच्या तुलनेत देवळाईत मतदानाचा टक्का वाढला.
नेते आले आणि गेले...
जवळपास सर्वच पक्षांच्या नेत्यांनी दोन्ही वॉर्डांत वाहने फिरविली. मुख्य मतदान केंद्रावर नेत्यांची वाहने येताच, उमेदवार व कार्यकर्त्यांचा घेराव होत असे. एकही नेता गाडीच्या खाली उतरला नाही. काही पदाधिकारी उमेदवारासोबत मतदान केंद्रात फेरफटका मारून आले. खा. चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, सभागृहनेते राजेंद्र जंजाळ, गटनेते राजू वैद्य, आ.संदीपान भुमरे, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, काँग्रेसचे आ. अब्दुल सत्तार, भाऊसाहेब जगताप, फिरोज पटेल, आतिश पितळे, भाजपचे किशनचंद तनवाणी, बसवराज मंगरूळे आदी नगरसेवकांनी वेगवेगळ्या भागात ठाण मांडले होते.
देवळाईकडेच सर्वांचे लक्ष
देवळाई या वॉर्डाकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे. भाजपचे अप्पासाहेब हिवाळे, शिवसेनेचे हरिभाऊ हिवाळे यांच्यापैकी कुणाचा विजय होतो की त्यांच्या भाऊबंदकीच्या वादात काँग्रेसचे राजेंद्र नरवडे पुढे येतात.
यावरून देवळाईत चौका-चौकांत चर्चा होती. देवळाईत मतदानाचा टक्का वाढल्यामुळे सगळ्यांचे भाकीत वेगवेगळ्या दिशेने सुरू होते. वाढलेले मतदान सेनेच्या की भाजपच्या पथ्यावर गेले. हे सोमवारी कळणारच आहे; परंतु आकडेमोड करीत काठावर का होईना आपलाच उमेदवार विजयी होणार असा दावा सर्व पक्षांतून केला गेला. साताऱ्यातही सर्व पक्षांच्या उमेदवारांनी आपणच विजयी होणार असल्याचा दावा केला.

Web Title: Devlaai 68, Satara 49%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.