शहरात १ लाख ३५ हजार झाडे लावण्याचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:06 IST2021-07-07T04:06:42+5:302021-07-07T04:06:42+5:30
औरंगाबाद : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात यंदा १ लाख ३५ हजार ६४३ झाडे लावण्यात येणार आहेत. खाम नदीपात्रात ...

शहरात १ लाख ३५ हजार झाडे लावण्याचा संकल्प
औरंगाबाद : वाढते प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेतर्फे शहरात यंदा १ लाख ३५ हजार ६४३ झाडे लावण्यात येणार आहेत. खाम नदीपात्रात १ लाख झाडे लावण्याचा संकल्प प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी केला आहे. शहरातील महापालिकेच्या मालकीच्या खुल्या जागा, रस्त्यांच्या दुतर्फा, कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या परिसरात देशी पद्धतीच्या झाडांची डेन्स फॉरेस्ट पद्धतीने लागवड केली जाणार असल्याचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले.
शहराच्या प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी वृक्षलागवडीवर भर देण्यात आला आहे. प्रशासक यांनी वर्षभरापासून शहरातील खुल्या जागा, हरित पट्ट्यांमध्ये जास्तीत जास्त झाडे लावण्याचे काम सुरू केले आहे. आमखास मैदान, हिमायतबाग रोडवरील मनपाचे प्रयोग यशस्वी झाले आहेत. पाटील यांनी सांगितले की, खाम नदीपात्रात सर्वाधिक १ लाख झाडे लावली जातील. शहरात बऱ्याच खुल्या जागा आहेत. त्यापैकी ४० जागांवर झाडे लावली जाणार आहेत. महापालिकेने गतवर्षी शहर परिसरात ८९ हजार झाडे लावली होती. तसेच २०१९ मध्ये ३५ हजार झाडे लावली होती. यंदा सर्वाधिक झाडे लावण्याचे उद्दिष्ट आहे. खाम नदीपात्रात झाडे लावण्याचा उपक्रम सुरू झाला आहेे; पण गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खंड पडला आहे. मोठा पाऊस होताच झाडे लावली जातील.
वृक्षारोपणाचे नियोजन
जागा- झाडे
उद्याने-९४-४८०५
रस्ते १८-३४८०
खुल्या जागा ४०-२२,३५८
कचरा प्रक्रिया प्रकल्प ०३-५०००
खाम नदी -१,०००००
-------------