केज तालुक्यात सावकाराकडून शेतकऱ्यावर दारुतून विषप्रयोग
By Admin | Updated: May 13, 2017 21:43 IST2017-05-13T21:40:33+5:302017-05-13T21:43:58+5:30
बीड : व्याजाने दिलेले पैसे परत देत नाही म्हणून एका शेतकऱ्यास खासगी सावकाराने दारुतून विषारी द्रव पाजले.

केज तालुक्यात सावकाराकडून शेतकऱ्यावर दारुतून विषप्रयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : व्याजाने दिलेले पैसे परत देत नाही म्हणून एका शेतकऱ्यास खासगी सावकाराने दारुतून विषारी द्रव पाजले. ही घटना केज तालुक्यात शनिवारी उघडकीस आली. लहू रामप्रसाद ढाकणे (२८, रा. सारुळ ता. केज) असे शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
वर्षभरापूर्वी ढाकणे यांनी जोला (ता. केज)येथील एका खासगी सावकाराकडून व्याजाने ५० हजार रुपये घेतले होते. १ लाख रुपये सव्याज परत करुनही सावकार परत ५० हजार रुपये मागत होता. दरम्यान, शुक्रवारी सावकाराने लहू ढाकणे यांना केज तालुक्यातील अंमळाचे बरड येथे बोलावून घेतले. तेथे एका हॉटेलमध्ये दोघांनी मद्यप्राशन केले. यावेळी सावकाराने ढाकणे यांना दारुतून विषारी द्रव पाजले. त्यामुळे ते अत्यवस्थ झाले. त्यांना नातेवाईकांनी तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. चौकी पोलिसांकडे त्यांनी सावकाराविरुद्ध जवाब नोंदविला आहे. ढाकणे यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत केज ठाण्यात गुन्हा नोंद झाला नव्हता.