मिठाईचे दुकान आगीत खाक

By Admin | Updated: June 12, 2016 00:03 IST2016-06-11T23:56:37+5:302016-06-12T00:03:52+5:30

औरंगाबाद : जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रोडवरील गोकुळ वृंदावन या मिठाईच्या दुकानाला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली.

Dessert shop | मिठाईचे दुकान आगीत खाक

मिठाईचे दुकान आगीत खाक

औरंगाबाद : जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रोडवरील गोकुळ वृंदावन या मिठाईच्या दुकानाला शनिवारी सकाळी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या भीषण आगीत हे संपूर्ण दुकान आणि मिठाई बनविण्याचा कारखाना जळून खाक झाला. या घटनेत अंदाजे २५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले.
प्राप्त माहिती अशी की, सिडको एन-३ मधील जयभवानीनगर ते पुंडलिकनगर रोडवर गोकुळ वृंदावन हे मिठाईचे दुकान आहे. दुकानमालक राजेश जैस्वाल हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी रात्री दुकान बंद करून घरी गेले. शनिवारी सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास दुकानात शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली. त्यामुळे चार शटर असलेल्या या कॉर्नरच्या दुकानामधून धुराचे लोट निघू लागले. प्रत्यक्षदर्शींनी या घटनेची माहिती दुकान मालक आणि अग्निशामक दलास दिली.
दुकानमालक येईपर्यंत आगीने संपूर्ण दुकान कवेत घेतले. दुकानातील लाकडी फर्निचर, सिलिंग, फ्रीज, टी. व्ही., सीसीटीव्ही कॅमेरे, तयार केलेला फरसान, मिठाईसह कच्चामाल, इलेक्ट्रिक वायरिंग आदींनी पेट घेतला. आगीच्या ज्वालामुळे दुकानाचे शटरही प्रचंड तप्त झाले होते. असे असताना दुकानमालकासह कर्मचाऱ्यांनी आणि नागरिकांनी या दुकानाचे चारीही शटर उघडून आग विझविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्यानंतर काही मिनिटातच अग्निशामक दलाचे जवान तेथे दाखल झाले. त्यांनी पंधरा ते वीस मिनिटांत ही आग विझविली.
या घटनेत संपूर्ण दुकान जळून खाक झाले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
आग विझविण्यासाठी अग्निशामक दलाचे एस. के. भगत, सोमनाथ भोसले, वैभव बागडे, अशोक वेलदोडे आणि चालक अशोक वाघ यांनी प्रयत्न केले.

Web Title: Dessert shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.