कारवाईच्या इशाऱ्यानंतरही डॉक्टारांचे आंदोलन कायम
By Admin | Updated: July 6, 2014 00:24 IST2014-07-06T00:00:10+5:302014-07-06T00:24:26+5:30
उस्मानाबाद : डॉक्टरर्स डेपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेले असहकार कामबंद आंदोलन शासनाच्या कारवाई इशाऱ्यानंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़

कारवाईच्या इशाऱ्यानंतरही डॉक्टारांचे आंदोलन कायम
उस्मानाबाद : डॉक्टरर्स डेपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सुरू केलेले असहकार कामबंद आंदोलन शासनाच्या कारवाई इशाऱ्यानंतरही कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ सलग पाचव्या दिवशीही रूग्णालयाकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याने रूग्णांची हेळसांड मात्र कायम होती़
आपल्या विविध मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बाह्य रूग्ण विभाग, आंतररूग्ण विभाग, अत्यावश्यक सेवा, एमएलसी, शवविच्छेदन, साथरोग, आरोग्यविषयक राष्ट्रीय कार्यक्रम राबविणे, शासकीय कामकाजावर बहिष्कार टाकल्याने आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे़ यानंतर प्रशासनाकडून मेस्माअंतर्गत कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता़ आरोग्य मंत्र्यांनी रविवारी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संप मागे घेवून कामावर रूजू न झाल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे़ त्यानंतर मॅग्मो संघटनेच्या वरिष्ठ पातळीवर झालेल्या बैठकीत आंदोलकांनी आपले आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे़
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाला सोमवारी राजपत्रित अधिकारीही पाठींबा देणार असल्याचे मॅग्मोचे विभागीय सचिव डॉ़ सचिन देशमुख यांनी सांगितले़ दरम्यान, डॉक्टरांचे सलग पाचव्या दिवशी आंदोलन सुरू असल्याचे रूग्णांची मात्र फरफट कायम होती़ (प्रतिनिधी)