निधी असूनही कामे ठप्प; अभियंत्याला दिली ताकीद

By Admin | Updated: November 22, 2015 23:40 IST2015-11-22T23:31:20+5:302015-11-22T23:40:33+5:30

जालना : राज्य सरकारकडून निधी मंजूर करवून आणल्यानंतरही रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी

Despite the funding, the work jam Warned the engineer | निधी असूनही कामे ठप्प; अभियंत्याला दिली ताकीद

निधी असूनही कामे ठप्प; अभियंत्याला दिली ताकीद


जालना : राज्य सरकारकडून निधी मंजूर करवून आणल्यानंतरही रस्त्यांच्या कामांची प्रक्रिया वेळेत पूर्ण होत नसल्याने भाजपा प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना चांगलेच खडसावले. सदर निधी वेळेत खर्च व्हावा व रस्त्यांची कामे नियोजित वेळेतच पूर्ण झाली पाहिजेत, अशा सक्त सूचना खा. दानवे यांनी कार्यकारी अभियंता यांना रविवारी दिल्या.
खा. दानवे यांनी जालना शहरातील रस्त्यांसह भोकरदन ते हसनाबाद व भोकरदन ते जाफराबाद या रस्त्यांसाठी राज्य सरकारकडून विशेष बाब म्हणून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून आणल्याचे सांगितले. मात्र, निधी उपलब्ध असूनही या कामांची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने त्यांनी बेलापट्टे यांची कानउघाडणी केली. तसेच जालना शहरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी जिल्हाधिकारी ए.एस.आर. यांच्याकडे आलेला आहे. व सिल्लोड-भोकरदन, भोकरदन- हसनाबाद आणि भोकरदन-जाफराबाद या रस्त्यांसाठी जवळपास १७ कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबतचा प्रस्तावच आपल्याकडे आला नसल्याचे त्यांनी खा. दानवे यांना सांगितले. त्यावर खा. दानवे यांनी बेलापट्टे यांना विचारले असता, याबाबतचा प्रस्ताव तात्त्काळ तयार करुन तो मुंबईत पाठविला जाईल, असे उत्तर दिले. तर जालना शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. याबाबतही पुढे काहीच झाले नसल्याने खा. दानवे यांनी नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारांमुळे आलेला निधी परत जाण्याची भीती व्यक्त करत भोकरदन नाक्यावरील अग्रसेन चौक ते शिवाजी पुतळा व्हाया टांगास्टॅण्ड, महावीर चौक ते मोतीबाग व्हाया मंमादेवी मंदिर, कचेरी रोड, शिवाजी चौक ते पाणीवेस आणि सावरकर चौक ते शोला चौक या रस्त्यांचे तातडीने काँक्रिटीकरणाचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश त्यांनी बेलापट्टे यांना दिले. शहरात तयार केले जाणारे रस्ते गुणवत्तापूर्ण असावे जेणेकरुन ते पुढील ३० वर्षे टिकले पाहिजेत, अशा सक्त सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.
कुठल्याही जिल्ह्याचा विकास रस्त्याच्या मार्गानेच होत असतो. मात्र, सद्यस्थितीत जालना जिल्ह्यातील विविध भागांतील बहुतांश रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. रस्त्यात खड्डे की खड्ड्यांत रस्ते असे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. खराब रस्त्यांमुळे अनेक निष्पाप लोकांचे बळीही गेले आहेत. असे असले तरी सार्वजनिक बांधकाम विभागाला याचे सोयरसूतक नसल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Despite the funding, the work jam Warned the engineer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.