निधी उपलब्ध असूनही आरोग्य तपासणी शिबिरे होईनात
By Admin | Updated: July 26, 2014 00:42 IST2014-07-25T23:49:10+5:302014-07-26T00:42:31+5:30
हिंगोली : मानव विकास मिशनअंतर्गत हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याकरीता

निधी उपलब्ध असूनही आरोग्य तपासणी शिबिरे होईनात
हिंगोली : मानव विकास मिशनअंतर्गत हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ तालुक्यात आरोग्य विभागाच्या वतीने बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी आरोग्य तपासणी शिबीर घेण्याकरीता गतवर्षीचा १३ लाख रुपयांचा निधी शिल्लक असूनही ही शिबिरे घेण्याकरीता आरोग्य यंत्रणेने दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.
मानव विकास मिशन अंतर्गत जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव व औंढा नागनाथ या तीन तालुक्यांची निवड करण्यात आली आहे. या तीन तालुक्यांतील बालमृत्यू व मातामृत्यू रोखण्यासाठी गर्भवती माता व कुपोषित बालकांची आरोग्य तपासणी शिबिरे घेण्यासाठी शासनाकडून निधी दिला जातो. प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्राने एका महिन्यात दोन आरोग्य तपासणी शिबिरे घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात अशी एकूण १२ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. गतवर्षी जिल्हा परिषदेला आरोग्य शिबिरे घेण्यासाठी देण्यात आलेल्या निधीपैकी १३ लाख रुपयांचा निधी अखर्चिक राहिला. हा निधी आरोग्य विभागाने मानव विकास मिशनला ३१ मार्चनंतर तात्काळ परत करावा, असे चार वेळा पत्र दिले; परंतु निधी परत करण्यात आला नाही. उलट निधी उपलब्ध नसल्याची कारण सांगून शिबीर घेण्यासही टाळाटाळ करण्यात आली.
एप्रिल ते जून या कालावधीत औंढा तालुक्यात व सेनगाव तालुक्यात प्रत्येक दोन अशी केवळ चार आरोग्य शिबिरे घेण्यात आली आहेत. हिंगोली तालुक्याने तर अद्याप खातेच उघडलेले नाही. १२ प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत दरमहा २४ शिबीर होणे आवश्यक आहे. एप्रिल ते जून या कालावधीत ३६ शिबिरे होण्याऐवजी केवळ ४ शिबिरे झाली, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. निधी नसल्याचे कारण दिले जात असेल तर शिल्लक असलेला १३ लाख रुपयांचा निधी का खर्च केला नाही? असाही सवाल उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे गतवर्षीही आरोग्य विभागाच्या वतीने मानव विकास मिशन अंतर्गत आरोग्य तपासणी शिबिरे घेण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यावरूनच आरोग्य विभाग या प्रश्नावर किती गंभीर आहे, हेच यावरून स्पष्ट होते. (जिल्हा प्रतिनिधी)