बंदी असतानाही अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्यावर भरला आठवडी बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:04 IST2021-04-30T04:04:57+5:302021-04-30T04:04:57+5:30
कायगाव : प्रशासनाने जिल्हाभरातील आठवडी बाजार बंद केलेले असताना गुरुवारी अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्यावर फुल आठवडी बाजार भरला. चार कि.मी. ...

बंदी असतानाही अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्यावर भरला आठवडी बाजार
कायगाव :
प्रशासनाने जिल्हाभरातील आठवडी बाजार बंद केलेले असताना गुरुवारी अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्यावर फुल आठवडी बाजार भरला. चार कि.मी. अंतरावरील दोन गावे कंटेन्मेंट झोन असताना असा बेजबाबदारपणा करणाऱ्या व्यापारी आणि नागरिकांसमोर आता प्रशासनाने हात टेकल्याचे दिसून येत आहे.
कोरोनाचा ग्रामीण भागात हाहाकार सुरू आहे. गर्दी टाळण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सगळे आठवडी बाजार बंद करण्यात आलेले आहेत. अगरवाडगाव, भिवधानोरा आणि गळनिंब परिसरातील गावांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून भिवधानोरा येथे दर गुरुवारी भरणारा आठवडी बाजारसुद्धा बंद करण्यात आला आहे. तालुक्यातील मोठ्या बाजारांपैकी एक असलेला एक भिवधानोऱ्याचा बाजार बंद असल्याने व्यापारी मंडळी हवालदिल झाली. मात्र, गुरुवारी सकाळी अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्यावरील दुतर्फा बाजूने कोरोनाचे सगळे नियम धाब्यावर बसवून व्यापाऱ्यांनी आठवडी बाजार भरविला. बाजार भरल्याचे पाहून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली. काही व्यापारी आणि खरेदीदारांनी मास्कचा वापर केल्याचे दिसून येत असले तरी अनेक जण विनामास्क आठवडी बाजारात फिरत असल्याचे दिसून आले. नियमबाह्यपणे भरलेल्या या बाजारात कुठेही सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळला गेला नाही. या आठवडी बाजाराला गळनिंब, धनगरपट्टी, भिवधानोरा, अगरवाडगाव येथील नागरिकांनी गर्दी केली होती.
चार कि.मी. अंतरावर असणाऱ्या कायगाव आणि भेंडाळा ही दोन्ही गावे कोरोनाचे कंटेन्मेंट झोन बनले आहेत. त्या गावांत प्रशासन कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी नियोजन
करत असताना जवळपास असणाऱ्या गावांचा निष्काळजीपणा मोठी समस्या उभी करण्याची शक्यता आहे. हा बाजार तीन तासांत संपल्यावर पोलिसांच्या पथकाने गावात भेट दिली. मात्र, तोपर्यंत सगळे जिकडेतिकडे झाले होते. व्यापारी आणि प्रशासनाच्या बेजबाबदारपणामुळे या भागात कोरोनाचा उद्रेक झाल्यास ग्रामस्थांना मोठी किंमत मोजावी लागण्याची शक्यता आहे.
फोटो :
अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्याच्या दुतर्फा बाजूने गुरुवारी सकाळी आठवडी बाजार भरला.
290421\tarekh ahemad usuf shaikh_img-20210429-wa0026_1.jpg
अगरवाडगाव- भिवधानोरा रस्त्याच्या दुतर्फा बाजूने गुरुवारी सकाळी आठवडी बाजार भरला.