निराश्रित परिचारिकाच बनली ‘आधार’
By Admin | Updated: December 1, 2014 00:51 IST2014-12-01T00:31:54+5:302014-12-01T00:51:10+5:30
संजय तिपाले , बीड सुखी संसाराला एचआयव्ही नावाच्या वादळाची दृष्ट लागली अन् सारा संसार उध्दवस्त झाला़ रक्ताच्या नात्याने झिडकारल्यावर ती निराश्रीत झाली़

निराश्रित परिचारिकाच बनली ‘आधार’
संजय तिपाले , बीड
सुखी संसाराला एचआयव्ही नावाच्या वादळाची दृष्ट लागली अन् सारा संसार उध्दवस्त झाला़ रक्ताच्या नात्याने झिडकारल्यावर ती निराश्रीत झाली़ ‘जगायचे कसे आणि कोणासाठी’ ? हा प्रश्न तिच्यापुढे उभा ठाकला़ परंतु अशाही स्थितीत तिने जगण्याची जिद्द सोडली नाही़ तिचे पाऊल ‘आनंदवना’त पडले आणि तिच्या जगण्याला नवा आयाम मिळाला़ आता एकेकाळची ती निराश्रित एचआयव्ही बाधितांसाठी आधार बनली आहे़
सीमा (नाव बदलले आहे) ही ५२ वर्षांची जालना जिल्ह्यातील परिचारिका़ पती वाहनचालक, दोन मुले असा सुखाचा संसाऱ गरिबीशी संघर्ष करत दोन्ही मुलांना तिने डॉक्टर केले़ परंतु संसाराच्या प्रवासाने अर्धा टप्पा पार केल्यावर तिला कळाले की, ती एचआयव्ही बाधित आहे़ ही धक्कादायक बाब जेव्हा समजली तेव्हा ती हादरूनच गेली़ कुटुंबियापासून तिने ही बाब लपवली नाही़ मात्र तिचा हा प्रामाणिकपणाच तिच्यासाठी संकट बनला़ पतीने झिडकारल्यावर तिला आधार होता पोटच्या गोळ्याचा़ मात्र, पोटाला चिमटे घेऊन ज्यांच्या गळ्यात डॉक्टरचा स्टेथोस्कोप चढविला तेही उलटले़ त्यानंतर तिला शेवटचा पर्याय होता तो माहेरचा़ परंतु सख्ख्या आईनेही थारा दिला नाही़ भावांनी देखील धिक्कारले़ आजारापेक्षा जवळच्यांनी नाकारल्याचा तिच्यावर सर्वाधिक आघात बसला़ जगण्याच्या प्रश्नानेच तिच्यापुढे पर्याय दिला तो बीड येथील एचआयव्ही बाधित मुलांच्या संगोपन करणाऱ्या ‘आनंदवन’ या संस्थेचा़ पत्ता शोधत तीन महिन्यांपूर्वी शहरात दाखल झाली़ संस्था मुलांसाठीची परंतु संचालक दत्ता बारगजे, संध्या बारगजे यांनी तिची व्यथा ऐकून तिला आश्रय दिला़ तीन महिन्यांतच ती आनंदवनात रमली़ एचआयव्ही बाधित ४८ मुलांच्या सेवेत तिने स्वत:ला वाहून घेतले आहे़