उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची ‘फिल्डींग’

By Admin | Updated: July 14, 2014 01:02 IST2014-07-13T23:29:34+5:302014-07-14T01:02:16+5:30

जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदनमध्ये नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे.

Deshpande's 'Filing' | उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची ‘फिल्डींग’

उपाध्यक्षपदासाठी इच्छुकांची ‘फिल्डींग’

जालना : जिल्ह्यात जालना, अंबड, परतूर आणि भोकरदनमध्ये नगरपालिकेच्या उपाध्यक्ष पदासाठी इच्छुकांनी फिल्डींग लावणे सुरू केले आहे. परतूरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार असे चित्र आहे. दरम्यान, उर्वरित तीन नगरपालिकांच्या अध्यक्षपदाची केवळ औपचारिक घोषणा बाकी आहे.
जालना नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या नगरसेविका पार्वताबाई रत्नपारखे यांची बिनविरोध निवड निश्चित आहे. उपाध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असल्याने या पदावर पक्षश्रेष्ठी कोणाची वर्णी लावणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यमान उपाध्यक्ष राजेश राऊत यांना पुन्हा संधी देणार की, इच्छुकांमधून नूरखान, विजय पांगारकर यांच्यापैकी एकाची वर्णी लावणार अशी चर्चा आहे. इच्छुकांनी पालिकेत आपण केलेल्या कामाची माहिती पक्षश्रेष्ठींपर्यंत पोहोचविल्याचे समजते.
अंबड - अंबड नगरपालिकेत नगराध्यक्षपदी मंगला कटारे यांना पुन्हा संधी देऊन पालकमंत्री राजेश टोपे यांनी सर्वांना धक्का दिला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे सात सदस्य आहेत. मात्र काँग्रेसने आपला उमेदवार उभा केला नाही. उपाध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष कैलास भोरे यांनाच संधी मिळणार की संतोष सोमानी यांची वर्णी लागणार याबाबत नागरिकांना उत्सुकता आहे.
परतूर - परतूर नगराध्यक्षपद हे इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी नगरविकास आघाडीतर्फे मंगेश डहाळे, सुनंदा शहाणे तर काँग्रेसतर्फे शेख करिमाबी यांनी आपले अर्ज सादर केलेले आहेत. नगरविकास आघाडी व त्यांचे प्रणित असे ११ सदस्य आहेत. काँग्रेसचे संख्याबळ ६ एवढे आहे. त्यामुळे नगरविकास आघाडीचा नगराध्यक्ष होणार, यात शंका नाही. नगरविकास आघाडीतर्फे सुनंदा शहाणे यांची नगराध्यक्षपदी तर विशाखा राखे यांची उपाध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.
भोकरदन - नगरपरिषदेच्या उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लावावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कसोटी पणाला लागणार असल्याचे चित्र पालिकेत आहे. नगराध्यक्षपदी काँग्रेसच्या रेखाताई चंद्रकांत पगारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाल्यात जमा आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे बहूमत असताना सुद्धा अध्यक्षपदासाठी त्या प्रवर्गातील नगरसेवक नसल्याने अध्यक्षपद हे काँग्रेसच्या ताब्यात गेले. राकॉचे नऊ,काँग्रेसचे सात व भाजपाचे एक असे एकूण सतरा नगरसेवक आहेत. मात्र राकाँमध्ये अंतर्गत धुसफूस असल्याने उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, हा प्रश्न कायम आहे.
परतूरमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणूक
उपाध्यक्षपदासाठी १६ जुलै रोजी दुपारी १ ते ३ या वेळेत नामनिर्देशन अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. ३ ते ३.३० पर्यंत छाननी, ३.३० ते ३.४५ पर्यंत उमेदवारी मागे घेणे तसेच ३.४५ वाजेनंतर निवडणूक प्रक्रिया घेतली जाणार आहे.
जिल्ह्यात जालना, अंबड व भोकरदन येथे नगराध्यक्ष पदाची निवड निश्चित झाली आहे. मात्र परतूर येथे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांसाठीची निवड होणे बाकी आहे. त्यामुळे परतूर नगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Deshpande's 'Filing'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.