जिथे देशमुख, तिथे निलंगेकर?
By Admin | Updated: March 28, 2017 23:53 IST2017-03-28T23:52:54+5:302017-03-28T23:53:24+5:30
उदगीर उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात असताना भाजप प्रणित पॅनलने आता पालकमंत्री निलंगेकरांना मैदानात उतरविले आहे़

जिथे देशमुख, तिथे निलंगेकर?
चेतन धनुरे उदगीर
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची रणधुमाळी अखेरच्या टप्प्यात असताना भाजप प्रणित पॅनलने आता पालकमंत्री निलंगेकरांना मैदानात उतरविले आहे़ चार दिवसांपूर्वीच माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी काँग्रेस प्रणित पॅनलसाठी सभा घेतल्यानंतर आता त्यापाठोपाठ पालकमंत्री उदगीरात बुधवारी सभा घेत आहेत़ त्यामुळे जिथे देशमुख उतरले तिथे आव्हान देण्यासाठी निलंगेकर उभे राहत आहेत़
उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ संचालक मंडळासाठी सुरु असलेली रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे़ २ एप्रिल रोजी मतदान होणार असल्याने काँग्रेस व भाजप प्रणित पॅनलने प्रचाराला गती दिली आहे़ त्यात आधी काँग्रेसने माजी सभापती शिवाजीराव हुडे यांना न्यायालयीन प्रक्रियेत अडकवून पहिला डाव टाकला़ त्यानंतर आपल्या प्रचाराचे घोडे वेगाने दामटत प्रत्येक मतदारांशी संवाद साधला़ शिवाय, माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची उदगीरमध्ये जाहीर सभा घेऊन बाजार समितीवर विजयाची गुढी उभारण्याचा संकल्प केला़ दरम्यान, काहीशा संथगतीने धावत असलेल्या भाजप प्रणित पॅनलने आता अखेरच्या टप्प्यात मात्र, संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे़ आमदार सुधाकर भालेराव हे ठाण मांडून आहेत़ शिवाय, दिलीपराव देशमुख यांच्या सभेला प्रत्युत्तर देण्यासाठी आता पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे अस्त्र बाहेर काढले आहे़ आतापर्यंत झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जिथे देशमुख जातील तिथे निलंगेकर पोहोचून त्यांना आव्हान देत आले आहेत़ याच धर्तीवर आता उदगीर बाजार समितीच्या निवडणुकीतही देशमुखांना आव्हान देण्यासाठी हो-नाही करीत अखेर पालकमंत्र्यांनी उडी टाकलीच! बुधवारी सायंकाळी ५़३० वाजता एमआयडीसी भागातील हुडे यांच्या दालमिल परिसरात निलंगेकर सभा घेत आहेत़ त्यामुळे अखेरच्या टप्प्यात चांगलीच चुरस तयार झाली आहे़