देशमुखांनी ‘गड’ राखला

By Admin | Updated: October 20, 2014 00:33 IST2014-10-20T00:26:01+5:302014-10-20T00:33:25+5:30

लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ३ काँग्रेस, २ भाजपा व एका अपक्षाला जागा मिळाली आहे. लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा जिंकून

Deshmukh maintains a 'fort' | देशमुखांनी ‘गड’ राखला

देशमुखांनी ‘गड’ राखला



लातूर : लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी ३ काँग्रेस, २ भाजपा व एका अपक्षाला जागा मिळाली आहे. लातूर शहर व लातूर ग्रामीण विधानसभा जिंकून देशमुखांनी गड राखला आहे. काँग्रेसचे गेल्या वेळेपेक्षा एका जागेचे नुकसान झाले असून, भाजपाने मात्र एक जागा अधिकची मिळविली आहे. सहापैकी तीन जागा राखत काँग्रेसने ५० टक्के यश मिळविले आहे. गेल्यावेळी रिडालोसला निवडून देणाऱ्या अहमदपूरने यंदाही मुख्य पक्षांच्या उमेदवारांना टाळून अपक्ष विनायकराव पाटील यांच्या गळ्यात विजयाची माळ घातली. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात सर्वाधिक ४९ हजारांचे मतांधिक्य माजी राज्यमंत्री अमित देशमुखांनी मिळविले. त्यांना तब्बल १ लाख १९ हजार ६५६ मते मिळाली. तर जिल्ह्यात सर्वात कमी आघाडी अहमदपूरचे अपक्ष विजयी उमेदवार विनायकरावांना मिळाली. ते फक्त ४००५ मतांच्या आघाडीने विजयी झाले आहेत.
जिल्ह्यात निलंगा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार संभाजीराव पाटील यांनी विजयाला गवसणी घालीत आता आपले काका अशोकरावांना पराभूत केले. यापूर्वी त्यांनी आजोबा व अशोकरावांचे पिताश्री माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकरांचा पराभव केला होता. बाप-लेकाचा पराभव केल्याचा विक्रम त्यांनी स्वत:च्या नावे केला. जिल्ह्याच्या राजकारणात अशी ही पहिलीच घटना घडली आहे.
लातूर जिल्ह्यातील सहा आमदारांपैकी दोन आमदारांचे तिकीट कटले होते. यात वैजनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री डॉ. शिवाजीराव निलंगेकर यांचा समावेश होता. तर अहमदपूरचे तिसरे आमदार बाबासाहेब पाटील रणांगणात पराभूत झाल्याने येत्या विधानसभेतून तीन विद्यमान आमदार बाहेर पडले आहेत. यातील संभाजीराव पाटील निलंगेकर व विनायकराव पाटील हे यापूर्वी एकेकदा निवडून आलेले आहेत, तर अ‍ॅड. त्रिंबक भिसे आमदार व्हायची पहिलीच वेळ आहे. जिल्ह्यातील ते एकमेव ‘फ्रेश’ आमदार आहेत. तर उर्वरित काँग्रेसचे अमित देशमुख, बसवराज पाटील मुरुमकर आणि भारतीय जनता पार्टीचे सुधाकर भालेराव यांनी आपापली आमदारकी राखली आहे.

Web Title: Deshmukh maintains a 'fort'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.