अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनुदानाला खोडा !
By Admin | Updated: April 7, 2016 00:28 IST2016-04-07T00:09:13+5:302016-04-07T00:28:59+5:30
बाळासाहेब जाधव , लातूर राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आधार मिळावा, यासाठी शासनाने

अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे अनुदानाला खोडा !
बाळासाहेब जाधव , लातूर
राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानांतर्गत लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवर्षणग्रस्त परिस्थितीमध्ये आधार मिळावा, यासाठी शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी ठिबक सिंचनची योजना सुरू केली. परंतु, या ठिबकच्या अनुदानापोटी मिळणारी रक्कम तीन महिन्यांत मिळण्याऐवजी अनेक वर्षांचा कालावधी लागत असल्याने शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीतही अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.
२०१३-१४ मध्ये ८१२० शेतकऱ्यांनी शाश्वत शेती अभियानांतर्गत ठिबक सिंचन घेण्यासाठी त्या-त्या तालुक्यांतील कृषी अधिकाऱ्यांकडे ठिबक सिंचनचा लाभ घेण्यासाठी अर्ज केले. अर्ज केलेल्या एकूण लाभार्थ्यांपैकी ३९१५ लाभार्थ्यांना १२ कोटी ४१ लाख ८० हजारांचे अनुदान मिळाले. परंतु, उर्वरित ४२०५ लाभार्थ्यांना मात्र तीन वर्षांनंतरही अनुदान मिळाले नाही. शेतकरी लाभार्थी या अनुदानासाठी कृषी विभागाकडे चकरा मारून थकले. तरीही त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही. याबाबत कृषी विभागाकडे या शेतकऱ्यांनी विचारणा केली की, केंद्राचा निधी आला, राज्याचा आला नाही. त्यामुळे वाटप करता येणार नाही. राज्याचा निधी उपलब्ध होताच ठिबक सिंचनच्या अनुदानाचे वाटप करू, असा दिलासा देण्याचे काम केले जात आहे. परंतु, वास्तवात मात्र ठिबक सिंचनचे अनुदान येऊनही त्याचे वेळेत वाटप होण्याऐवजी खऱ्या लाभार्थ्यांना या अनुदानापासून वंचित रहावे लागत आहे.
तर काही नंतर अर्ज केलेल्या लाभार्थ्यांना अधिकाऱ्यांशी सलगी असल्याने वेळेत अनुदान मिळाल्याचे प्रकारही समोर आले आहेत. त्यामुळे या ठिबक सिंचनच्या लाभार्थी शेतकऱ्यांनी रखडलेल्या अनुदानाबाबत न्याय मागायचा तरी कोणाकडे, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.