हक्काच्या घरासाठी तरूणीची वणवण !
By Admin | Updated: November 28, 2014 01:12 IST2014-11-27T23:46:26+5:302014-11-28T01:12:56+5:30
बीड : गेली वर्षभरापासून एका तरूणीला तिच्या घराचा पत्ता हवा आहे. आई वडीलांना भेटायचं आहे परंतु नेमकं ना गावाचे नाव माहिती आहे ना राज्य.

हक्काच्या घरासाठी तरूणीची वणवण !
बीड : गेली वर्षभरापासून एका तरूणीला तिच्या घराचा पत्ता हवा आहे. आई वडीलांना भेटायचं आहे परंतु नेमकं ना गावाचे नाव माहिती आहे ना राज्य. वर्षभरापासून परप्रांतातून आलेली एक तरूणी सध्या येथील आश्रय अल्पमुदती निवासगृहात आहे. तिला काहीच आठवत नाही आणि काही सांगताही येत नाही. परंतु आपल्या कुटुंबात पुन्हा जाण्याची उत्सुकता मात्र तिला लपविता येत नाही.
साधारणपणे तीस वर्षाची ही तरूणी असून तिला तिच्या स्वत:च्या नावाशिवाय काहीच आठवत नाही. रजनी असे ती आपले नाव सांगत असून चौदा महिन्यांपूर्वी माजलगाव तालुक्यातील जायकोचीवाडी परिसरात ती एकटीच फिरत असताना गावकऱ्यांनी पोलीसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीसांनी तिला बीड येथील आश्रय अल्पमुदती निवासगृहात पाठविले.
या निवासगृहात दोन महिने ठेवल्यानंतर वैद्यकीय सल्यानुसार तिला पुणे येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविले. वर्षभर उपचार घेतल्यानंतर आता पुन्हा तिला येथील निवासगृहात पाठविण्यात आले असून आता तिला तिचे स्वत:चे घर हवे आहे़ परंतु तिला आपला पत्ता आठवत नाही आणि काहीच धडपणे सांगता येत नाही. तिच्या सुरूवातीच्या बोलण्यावरून ती पश्चिम बंगालमधील असावी, असा पोलीसांनी अंदाज बांधला असून तिला माजलगाव परिसरात नेमके ती कशी आली ? कोणी आणून सोडले ? आणि आता तिला नेमके कोठे जायचे आहे, हे कोडे कायम आहे़
आश्रय अल्पमुदती निवासगृहाच्या उषा जाधव आणि आशा धनवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या ती तिला सांगितलेल्या सूचनांचे पालन करते. आता तिला मराठीही समजू लागले आहे. तिच्या घराचा पत्ता शोधण्यासाठी या कर्मचाऱ्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आहेत. (प्रतिनिधी)