उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर ?
By Admin | Updated: June 19, 2014 00:17 IST2014-06-18T23:45:42+5:302014-06-19T00:17:14+5:30
मोहन बोराडे, सेलू विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिने वाढविल्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवर गेली होती़ परंतु, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारीही पूर्ण झाली होती

उपनगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर ?
मोहन बोराडे, सेलू
विद्यमान नगराध्यक्षांचा कार्यकाळ ६ महिने वाढविल्यामुळे नगराध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवर गेली होती़ परंतु, उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारीही पूर्ण झाली होती मात्र उपनगराध्यक्षपदाची निवडणूकही लांबणीवर टाकण्यात आली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे़ त्यामुळे इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे़ उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता़ त्यामुळे नगरपालिकेतील गटातटाचे राजकारणाने चांगलाच वेग घेतला होता़
आपल्याच गटाचा उपाध्यक्ष व्हावा यासाठी नेत्यांनी तयारी केली होती़ उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्यामुळे नगरसेवकांनाही चांगलाच भाव आला होता़ त्यातच अटीतटीच्या प्रसंगी घोडेबाजार तेजीत आला होता़ मात्र शासनाने नगराध्यक्ष पदानंतर उपनगराध्यक्षाची ही निवडणूक लांबणीवर टाकली असल्याची माहिती आहे़
दरम्यान, नगराध्यक्षपदाची निवडणुकीसोबतच उपनगराध्यक्षाचीही निवडणुक होण्याची चिन्हे आहेत़ सेलूचे नगराध्यक्षपद अडीच वर्षांसाठी ओबीसीसाठी राखीव आहे़ त्यामुळे अनेक मातब्बरांचा उपनगराध्यक्ष पदावर डोळा होता़ निवडणूक लांबल्यामुळे त्यांचा हिरमोड झाला आहे़ नगराध्यक्षपदासाठी अनेक नगरसेवक सहलीवरही गेले होते मात्र ही निवडणूक लांबली, त्यामुळे उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत गेलेला चान्स मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता़ परंतु, निवडणुक लांबणीवर गेल्यामुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी पडले आहे़ सेलू पालिकेत काँग्रेस नगरसेवकात मागील निवडणुकीत फुट पडली होती़ त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक संदीप लहाने हे उपनगराध्यक्षपदी विराजमन झाले होते़ मात्र आमदार बोर्डीकर गटाने आपला उपनगराध्यक्ष करण्यासाठी बहुमताची तयारी केली होती़ परंतू, निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे विद्यमान उपनगराध्यक्ष संदीप लहाने यांना दिला मिळाला आहे़ एकूणच नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षाची निवडणुक लांबणीवर पडल्याने इच्छुक नगरसेवकांचा हिरमोड झालाच तसेच मोर्चो बांधणीही निष्फ ळ ठरली आहे़ दोन्ही पदाची निवडणुक लांबणीवर गेल्यामुळे प्रमुख नेत्यांची डोकेदुखी कमी झाली आहे़ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुका लांबल्यामुळे नेतेही टेंन्शन फ्री झाले आहेत़
निवडणुकीबाबत चर्चेला वेग
अगोदर नगराध्यक्षपदाची व नंतर उपाध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे इच्छुकांची निराशा झाली़ निवडणूक जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांनाही चांगलाच भाव आला होता़
निवडणुकीत कोणत्या गटाला कोण मतदान करणार याबाबत शहरात चर्चा झडत होत्या़ मात्र दोन्हीही पदाची निवडणुक लांबणीवर पडल्यामुळे पालिकेतील राजकारणाला तात्पुरता पूर्णविराम मिळाला आहे़
तसेच विद्यमान नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनाही सहा महिने अधिकचे मिळाले आहेत़