उपसंचालकांनी क्रीडाअधिकाऱ्यांना सुनावले
By Admin | Updated: December 3, 2014 01:15 IST2014-12-03T01:05:08+5:302014-12-03T01:15:43+5:30
गजेंद्र देशमुख , जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल ‘लोकमत’मधून वास्तव चित्र सादर करण्यात आले. ‘खेळखंडोबा संकुलाचा’ या मथळ्याखाली विविधांगी

उपसंचालकांनी क्रीडाअधिकाऱ्यांना सुनावले
गजेंद्र देशमुख , जालना
येथील जिल्हा क्रीडा संकुलाच्या झालेल्या दुरवस्थेबद्दल ‘लोकमत’मधून वास्तव चित्र सादर करण्यात आले. ‘खेळखंडोबा संकुलाचा’ या मथळ्याखाली विविधांगी वृत्तमालिकाही प्रकाशित करण्यात आली होती. याची दखल विभागीय क्रीडा उपसंचालक चंद्रकांत कांबळे व इतर अधिकाऱ्यांनी जिल्हा संकुलाची मंगळवारी बारकाईने पाहणी करुन क्रीडाधिकाऱ्यांना संकुलात सुधारणा करण्याच्या कडक सूचना केल्या.
शासनाने कोट्यवधी रुपये खर्च करुन जिल्ह्यातील खेळाडूंचा विकास व्हावा, त्यांच्या खेळांना चालना मिळावी तसेच शालेय सोबतच विभागीय स्पर्धा घेता याव्यात, यासाठी सुसज्ज असे संकुल उभारले आहे. मात्र आजरोजी या संकुलाची अवस्था विदारक अवस्था आहे.
येथील सर्व्हे नं.४८८ परिसरात जिल्हा क्रीडा संकुल आहे. नियमीत देखभाल व नियोजनाअभावी संकुलाची शकले उडाली आहेत. क्रीडा अधिकाऱ्यांसह जिल्हा प्रशासनाचेही या संकुलाकडे अक्षम्य असे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. परिणामी जिल्ह्याचा क्रीडा विकास कागदोपत्रीच होत आहे. संकुलात असलेल्या अत्यंत तोकड्या सुविधा व आहे त्या साधनांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे परिस्थिती भयावह बनली आहे. संकुलात खेळाडूंसाठी अत्याधुनिक अशी व्यायाम शाळा, टेबल टेनिस, लॉँग टेनिस, व्हॉलीबॉल, बॉस्केटबॉल, किक बॉक्सींगसाठी सुसज्ज असा व लाकडी फर्निचर केलेला मोठा हॉल आहे. या हॉलकडे पाहिले असता एखाद्या गोदामाची आठवण होते. खेळाडूंना गरजेपुरत्याही सुविधा मिळत नसल्याने हे संकुल काय कामाचे असा संतप्त सवाल खेळाडू तसेच क्रीडा प्रेमींतून व्यक्त होत आहे. संकुलातील व्यायाम शाळा नावासाठीच उरली आहे.
या संपूर्ण मालिकेची दखल घेत क्रीडा उपसंचालकांनी संकुल परिसर, इनडोअर हॉल, पडलेले छत, असलेले क्रीडा साहित्य पाहिले. काही भाग पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले. दुपारी कांबळे यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
लोकमतमधील पालिका संकुलाच्या दुरवस्थेचीही कांबळे यांनी दखल घेतली. जालना नगर पालिकेचे मुख्याधिकारी व नगराध्यक्षांची भेट घेण्याच्या सूचना क्रीडाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. हे संकुल क्रीडा विभागाकडे वर्ग होऊ शकते का,याबाबत ही चर्चा करण्याचे सांगण्यात आले आहे. येथे इनडोअर हॉल करुन बॅटमिंटन अथवा व्हॉलिबॉल आदी छोट्या मोठ्या स्पर्धा घेता येतील.
याविषयी क्रीडा उपसंचालक कांबळे म्हणाले, संकुलाची पाहणी करण्यात आली. छत तसेच इतर बाबींच्या तात्काळ सुधारणा करण्याच्या सूचना केल्या. यासाठी आराखडा सादर करण्याचे सांगितले. व्यायाम शाळाही सुरु करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. खेळाडूंसाठी असणारे हॉस्टेलही लवकरच सुरु होईल,याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खेळाडूंनीही येथे खेळासाठी नियमित आल्यास संकुलाचा निश्चित विकास होईल. नागरिक अथवा खेळाडू येत नसल्याने काहीअंशी विकास रखडतो. क्रीडा समितीची बैठक होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. काही कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांची भेट झाली नसल्याचे कांबळे म्हणाले.