उपजिल्हाधिकारी निलावाड निलंबित
By Admin | Updated: September 13, 2014 00:10 IST2014-09-13T00:06:06+5:302014-09-13T00:10:01+5:30
हिंगोली : निवडणूक निर्णय अधिकारी एम. बी. निलावाड यांना निलंबित करण्याचे आदेश काढण्यात आले.

उपजिल्हाधिकारी निलावाड निलंबित
हिंगोली : कळमनुरीचे उपविभागीय अधिकारी तथा विधानसभेसाठी नियुक्त निवडणूक निर्णय अधिकारी एम. बी. निलावाड यांना निलंबित करण्याचे आदेश शुक्रवारी विभागीय आयुक्त कार्यालयातून काढण्यात आले.
निलावाड यांची मागील महिन्यात हिंगोली येथील जिल्हाधिकारी कार्यालयातून कळमनुरी उपविभागीय अधिकारीपदी नियुक्ती झाली होती. ते जिल्हा कचेरीत सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी होते.
मात्र उपविभागीय पदाचा पदभार स्वीकारण्यात त्यांना कोणताच रस नव्हता. त्यामुळे सुरुवातीला काही दिवस त्यांनी तेथे जाणेच टाळले. नंतर विभागीय आयुक्तांकडे बदलीसाठी प्रयत्न केले. मात्र काहीच होत नसल्याने ते सतत गैरहजर राहात होते. त्यांनी मॅटमध्ये जाण्याचाही प्रयत्न केला. मात्र ऐनकेन प्रकारे यामध्ये यश येत नसल्याचे दिसत असल्याने त्यांची नाराजी वाढत गेली. परिणामी त्यांनी निवडणूक कामाकडे दुर्लक्ष करून कार्यालयातही उपस्थिती लावली नाही.
निवडणूक आचारसंहिता लागली तरी ते संपर्कात नसल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. निलावाड यांना निलंबित करण्यात आल्याचे आदेश सायंकाळी उशिरा प्राप्त झाले. त्याला जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी दुजोरा दिला. निवडणूक प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण यांची या ठिकाणी सध्या नियुक्ती केली आहे.
(जिल्हा प्रतिनिधी)