‘कन्या कल्याण’ योजनेस उदासीनता
By Admin | Updated: June 30, 2014 00:38 IST2014-06-30T00:15:15+5:302014-06-30T00:38:16+5:30
सितम सोनवणे , लातूर कुटुंबात १ अथवा २ मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना राबविण्यात येत आहे.

‘कन्या कल्याण’ योजनेस उदासीनता
सितम सोनवणे , लातूर
महिलांचा सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी कुटुंबात १ अथवा २ मुलींवर कुटुंब नियोजन करणाऱ्या जोडप्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना राबविण्यात येत आहे. मात्र ही योजना राबविण्यात स्थानिक प्रशासनाची उदासीनता आहे. सहा वर्षांत केवळ २६ लाभार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळाला.
दारिद्र्यरेषेखालील कुटुंबासाठी ही योजना १९९५ मध्ये सुरू करण्यात आली. १९९६ मध्ये या योजनेत सुधारणा करण्यात आली. एका मुलीनंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यास २ हजार रुपये रोख व मुलीच्या नावे ८ हजारांचे बचत प्रमाणपत्र. दोन मुलींवर कुटुंब नियोजन केल्यास रोख २ हजार व प्रत्येकी मुलींच्या नावे ४ हजारांचे बचत प्रमाणपत्र असे स्वरूप या योजनेचे आहे.
मात्र ही योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे प्रस्तावाचे प्रमाण कमी आहे. २००८-०९ मध्ये तीन कुटुंबांंना, २००९-१० मध्ये पाच, २०१०-११ मध्ये एक, २०११-१२ मध्ये सहा, २०१२-१३ मध्ये तीन, २०१३-१४ मध्ये आठ अशा २६ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. त्यांना शस्त्रक्रियेच्या वेळी रोख २ हजार व त्यांच्या मुलींच्या नावे बचत प्रमाणपत्र मिळाले आहे. २०१४-१५ सालात तर फक्त तीन प्रस्ताव आले आहेत. त्यातही त्रुटी आहेत. सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजनेची जनजागृती केली नसल्यामुळे लाभार्थ्यांचे प्रमाण नगण्य आहे. ग्रामीण स्तरावर जि.प.चा आरोग्य विभाग व शहरी स्तरावर न.प.च्या आरोग्य विभागातर्फे प्रस्ताव घेतले जातील. मात्र जि.प. व न.प.च्या आरोग्य विभागाची उदासीनता असल्यामुळे ही योजना कागदावरच राहत आहे.
प्रसार करूनही प्रस्ताव अल्प..़
सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना प्रोत्साहन मिळावे म्हणून सुरू करण्यात आली आहे. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. योजना जुनी झाली आहे. प्रत्येकाला योजनेची माहिती आहे. तरीही प्रस्ताव कमी येत आहेत. चालू वर्षात तीन प्रस्ताव आले आहेत. त्यातील त्रुटी दुरुस्त करून संबंधितांना या योजनेचा लाभ मिळवून दिला जाईल, असे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.