प्राथमिक आरोग्य केंद्राचा बोजवारा
By Admin | Updated: March 26, 2015 00:54 IST2015-03-26T00:44:14+5:302015-03-26T00:54:58+5:30
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील ४० खेडेगावांचा संपर्क असलेले कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्राचा बोजवारा
कुंभार पिंपळगाव : घनसावंगी तालुक्यातील ४० खेडेगावांचा संपर्क असलेले कुंभार पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी गैरहजर राहत असल्याने रुग्णांची गैरसोय होत आहे.
दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पदे मंजूर असलेल्या आरोग्य केंद्रात एकच डॉक्टर उपलब्ध असल्याने रात्री काही अडचण आल्यास रुग्णांना घनसावंगी, अंबड येथील रुग्णालयात पाठवावे लागते. दोन दिवसांपूर्वी पाडुळी फाट्यावर दुचाकीस्वाराचा अपघात घडला होता. अपघातामुळे वाहनचालकाच्या डोक्याला व पायाला जबर मार लागला होता. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन व्यक्तींना शनिवारी रात्री ७.३० ला प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. परंतु दवाखान्यात कोणीच उपलब्ध नसल्याने सुमारे ८ वाजेपर्यंत वैद्यकीय अधिकाऱ्यांची वाट पहात बसावे लागले. परंतु वैद्यकीय अधिकारी न आल्याने त्या रुग्णांना खाजगी वाहनातून जालन्याकडे हलविण्यात आले.
वैद्यकीय अधिकारी दवाखान्यात हजर नसल्याने मागील अनेक दिवसांपासून ओपीडी विभाग बंदच आहे. वैद्यकीय अधिकारी हजर राहावा , अशी मागणी गावकऱ्यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. तर रुग्णांना योग्य ती सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.