ठेवीसाठी महिलांची जिल्हा बँकेत धडक
By Admin | Updated: July 4, 2014 00:14 IST2014-07-03T23:20:13+5:302014-07-04T00:14:03+5:30
बीड: येथील जिल्हा बॅँकेत सामान्य ठेवीदारांचे तब्बल सातशे कोटी रुपये अडकलेले आहेत. अनेक ठेवीदार रुग्णालयात अंतीम घटका मोजत आहेत.

ठेवीसाठी महिलांची जिल्हा बँकेत धडक
बीड: येथील जिल्हा बॅँकेत सामान्य ठेवीदारांचे तब्बल सातशे कोटी रुपये अडकलेले आहेत. अनेक ठेवीदार रुग्णालयात अंतीम घटका मोजत आहेत. अशापरिस्थितही बॅँक पैसे देत नसल्याने मनसे महिला आघाडीच्या सदस्यांनी बुधवारी रात्री जिल्हा बॅँकेवर धडक मारली. यावेळी आंदोलक महिलांना पोलीसांनी ताब्यात घेतले.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकमध्ये महिला, वृद्ध, निराधार, निवृत्तीवेतनधारक आदींचे कोट्यवधी रुपये अडकलेले आहेत. हे पैसे ठेवीदारांना मिळत नसल्याने ठेवीदार अडचणीत आले आहेत. ठेवीदारांना त्यांचे पैसे द्यावेत यासाठी मनसे महिला जिल्हा आघाडीच्या अध्यक्षा रेखा फड यांनी बॅँकेचे प्रशासक मुकणे यांच्यासह जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन दिले आहे. या संदर्भात बुधवारी आल्यावर चर्चा करतो, असे प्रशासक मुकणे हे म्हणाले रेखा फड यांना म्हणाले होते. बुधवारी फड यांनी अनेकदा मुकणे यांना फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. शेवटी रात्री आठच्या सुमारास बॅँकेत गेल्या. यावेळी येथील सुरक्षारक्षकांनी गेट उघडण्यास नकार दिला.
यानंतर रेखा फड, दैवशाला शिंदे व अॅड. संगीता चव्हाण यांनी गेटवरून उडी मारून बॅँकेच्या आवारात प्रवेश केला. यावेळी शहर ठाण्याचे पोलीस दाखल झाले होते. यांनी तिनही महिलांना ताब्यात घेतले. यासंदर्भात रेखा फड म्हणाल्या की, प्रशासक मुकणे बॅँकेत आल्याची माहिती आपणास मिळाली होती. यावरून आपण निवेदन देण्यासाठी बॅँकेत गेलो होतो.
या संदर्भात माहिती घेण्यासाठी मुकणे यांना भ्रमणध्वनी केला असता, संपर्क होऊ शकला नाही. तर, शहर ठाण्याचे या आंदोलनात समीना बेगम, मंगल गाढे, संगीता वाघमारे, अरूणा चौरे, ज्योती कांबळे या मनसेच्या महिला सदस्यांनीही सहभाग घेतला होता.
नलिनी देशमुख
यांना उपचारासाठी पैशांची गरज
अंबाजोगाई येथील नलिनी देशमुख (६५) यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत. त्यांचे पती व मुलगा यांचे काही दिवसांपूर्वीच निधन झाले आहे. नलिनी यांनाही कर्करोग आहे. त्यांच्या उपचारासाठी चार लाख रुपये खर्च असल्याचे पुण्यातील डॉक्टरांनी सांगितले आहे. नलिनी यांचे डीसीसीमध्ये ७ लाख रुपये आहेत. उपचारासाठी चार लाखांची मागणी मुकणे यांच्याकडे केल्याचे रेखा फड यांनी सांगितले. नलिनी देशमुख यांना वेळीच उपचार मिळावेत यासाठी बॅँकेने पैसे द्यावेत अशी मागणी फड यांनी केली. (प्रतिनिधी)