मयत लाभार्थ्यांच्या नावेही पैसे जमा !
By Admin | Updated: October 21, 2014 00:56 IST2014-10-21T00:29:33+5:302014-10-21T00:56:58+5:30
उस्मानाबाद : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची रक्कम सबधितांना वाटप करण्यासाठी बँकेकडे जमा करण्यात येत असे. मात्र, यातील किती लाभार्थी हयात आहेत

मयत लाभार्थ्यांच्या नावेही पैसे जमा !
उस्मानाबाद : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची रक्कम सबधितांना वाटप करण्यासाठी बँकेकडे जमा करण्यात येत असे. मात्र, यातील किती लाभार्थी हयात आहेत व कितींचा मृत्यू झाला, याची कसलीही खातरजमा न करता वर्षानुवर्षे हा निधी असाच लाभार्थ्यांच्या नावे बँकेकडे पाठविला जात असून, बँकेतही तो तसाच पडून राहत असल्याचे पुढे आले आहे. तुळजापूर तालुक्यातील काही बँकांची प्रशासनाने पाहणी केल्यानंतर जिल्हा बँकेच्या विविध शाखांमध्ये तब्बल ११५ मयत लाभार्थ्यांच्या नावे असे लाखो रूपये पडून असल्याचे समोर आले आहे.
शासनाच्या वतीने निराधारांसाठी श्रावणबाळ, संजय गांधी आदी योजना राबवून यातून त्यांचा उदरनिर्वाह भागविण्यासाठी अनुदान दिले जाते. परंतु, संबंधितांना हे अनुदान वेळच्या वेळी मिळत नसल्याच्या तक्रारी नेहमीच ऐकावयास मिळतात. याच अनुषंगाने जिल्हा प्रशासनाच्या वतीने मध्यंतरी जिल्ह्यात बँकांकडे अशा अुनदानापोटी जमा झालेल्या रकमांची तपासणी करण्यात आली. यात जिल्ह्यातील बहुतांश बँकामधून शासकीय योजनेच्या विविध लाभार्थ्यांच्या नावे प्रशासनाकडून पैसे जमा करण्यात आले असले तरी बहुतांश बँकांकडून वाटप नसल्याचे उघड झाले आहे. तसेच तुळजापूर तालुक्यातील विविध बँकाच्या तपासणीत संजय गांधी निराधार योजनेच्या ११५ मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात आल्याचेही दिसून आले. यात नळदुर्ग येथील सात, जळकोट २, काक्रंबा ५, सावरगाव २७, अणदूर ११, काटी २१, होर्टी २, नंदगाव २१ तर आरळी बु शाखेतील १० मयत लाभार्थ्यांच्या नावांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)