१६ लाख ८० हजार शासनाच्या खात्यावर जमा
By Admin | Updated: December 22, 2014 23:58 IST2014-12-22T23:58:53+5:302014-12-22T23:58:53+5:30
उसानाबाद : शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाची रक्कम मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर पडून असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची गंभीर दखल घेत

१६ लाख ८० हजार शासनाच्या खात्यावर जमा
उसानाबाद : शासनाच्या विविध योजनांच्या अनुदानाची रक्कम मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर पडून असल्याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिध्द केल्यानंतर याची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी ही रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले होते. त्यानुसार उस्मानाबाद तहसीलदारांनी यापैकी १६ लाख ८० हजार रूपये जमा केले असले तरी अन्य तालुक्यातून मात्र याबाबत अद्याप कसलीच कार्यवाही केली नसल्याचे दिसत आहे.
मागील दोन तीन महिन्याखाली शेतकऱ्यांच्या पिक कर्जावर बँका जादा व्याज दर, सेवा शुल्क लावत आल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पिक कर्जाबरोबरच बँकांकडून इतर शासकीय विविध योजनांचे कामकाज व्यवस्थित चालते की नाही, याचीही तपासणी करण्याचे आदेश दिले होते. याच तपासणीदरम्यान अनेक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर मोठ्या प्रमाणात शासकीय योजनेच्या रकमा पडून असल्याचेही समोर आले होते.
याच अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांनी सदरील सर्व रक्कम शासनाच्या खात्यावर जमा करून घेण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले होते. या आदेशानुसार उस्मानाबाद तहसीलदार सुभाष काकडे यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पाच शाखांत मयत लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा असलेले १६ लाख ८० हजार ७८९ रुपये शासनाच्या खात्यावर जमा केले आहेत. काकडे यांनी दिलेल्य माहितीनुसार जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य शाखेत ४ लाख ५६ हजार २८९ रुपये, उपळा शाखेतून ३० लाभार्थ्यांचे ३ लाख २८ हजार, रुईभर शाखेमधून २ लाख ९ हजार ४०० रुपये तर येडशी व जागजी येथून ४ लाख ३० हजार रुपये शासनाच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)