‘बाटू’ चे विभागीय केंद्र शासकीय अभियांत्रिकीत?
By Admin | Updated: July 3, 2017 01:04 IST2017-07-03T01:01:00+5:302017-07-03T01:04:31+5:30
औरंगाबाद : लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) विभागीय केंद्र औरंगाबादेत होणार आहे.

‘बाटू’ चे विभागीय केंद्र शासकीय अभियांत्रिकीत?
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : लोणेरे (जि. रायगड) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे (बाटू) विभागीय केंद्र औरंगाबादेत होणार आहे. यासाठी अनेक दिवसांपासून जागेचा शोध सुरू होता. हा शोध संपण्याची चिन्हे आहेत. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील जागेची पाहणी ‘बाटू’चे कुलसचिव, तंत्रशिक्षण सहसंचालक आणि महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी केली. प्राथमिक स्तरावर या जागेला होकार मिळाला असून, अंतिम निर्णय ‘बाटू’ला घ्यावयाचा आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाला राज्यातील सर्वच अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालये जोडण्याचा निर्णय घेतला. पहिल्या वर्षी सर्वांनाच ‘बाटू’चे संलग्नीकरण घेण्याचा निर्णय ऐच्छिक ठेवण्यात आला होता. या निर्णयामुळे मराठवाड्यातील १० अभियांत्रिकी महाविद्यालयांनी ‘बाटू’चे संलग्नीकरण घेतले. यात औरंगाबादेतील महत्त्वाच्या ६ महाविद्यालयांचा समावेश आहे. यामुळे ‘बाटू’ प्रशासनाने औरंगाबादेत विभागीय केंद्र आणि नांदेडला उपकेंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ‘बाटू’च्या विभागीय केंद्रासाठी अनेक दिवसांपासून जागाच मिळत नव्हती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला जागा मागण्यात आली. सुरुवातीला ती देण्यात आली. त्यानंतर विद्यापीठाने आपला निर्णय फिरवत जागा देण्यास नकार दिला. तेव्हापासून तात्पुरत्या स्वरुपात जागा मिळविण्याचे प्रयत्न ‘बाटू’ने सुरू केले होते. यात छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने बाटूच्या केंद्राला जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यास प्राथमिक पातळीवर मान्यताही मिळाली. याच वेळी शहरातीलच श्रेयश अभियांत्रिकी महाविद्यालयानेही आपल्या महाविद्यालयात केंद्र सुरू करण्याचा प्रस्ताव दिला. यात मंत्रीस्तरावरून ‘बाटू’ प्रशासनावर दबाव आल्यामुळे ‘सीएसएमएस’चा प्रस्ताव बारगळला असल्याचे सूत्रांनी सांगितले. तसेच बाटूचे विभागीय केंद्र शासकीय जागेतच करण्याचे आदेश मंत्रालयातून मिळाले. यामुळे ‘बाटू’चे कुलसचिव डॉ. सुनील भांबरे यांनी तंत्रशिक्षण सहसंचालक डॉ. महेश शिवणकर यांच्यासह शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील अधिकाऱ्यांना सोबत घेऊन जागेची पाहणी केली. ही जागा शासकीय पॉलिटेक्निक महाविद्यालयाच्या शेजारील अभियांत्रिकी महाविद्यालयाची आहे. ही जागा वापरण्यास देण्यास अभियांत्रिकी महाविद्यालय तयार आहे. आता निर्णय ‘बाटू’ प्रशासनाला घ्यावा लागणार असल्याचे समजते. या जागेची पाहणी करण्यासाठी ‘बाटू’चे आणखी एक पथक लवकरच औरंगाबादेत येणार आहे. त्यानंतरच शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने देऊ केलेल्या जागेचा अंतिम निर्णय होणार आहे.