-साहेबराव हिवराळे-
औरंगाबाद: वनविभागाच्या परिश्रमाने कोरोनाकाळात हर्सूल तलावानजीकच्या खडकाळ जमिनीवर घनदाट वृक्षराजी फुलली आहे. गेल्या ९ महिन्यांत झाडाची उंची डोक्यावर फिरली असून परिसराने आता हिरवागार शालू पांघरला आहे. त्यावर निवारा करणाऱ्या बहुरंगी व बहुढंगी पक्ष्यांच्या चिवचिवाटाने परिसर शहरवासियांना मोहिनी घालत आहे.
जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार वृक्षलागवडीचा हा उपक्रम वनविभागाने मनपाच्या हद्दीत राबविला. डेन्स फॉरेस्ट उभारण्याच्या संकल्पनेस मनपाने ही होकार देऊन वृक्षलागवडीची जबाबदारी वनविभागाला दिली. त्यांनी ती आनंदाने स्वीकारली. हर्सूल तलावाच्या जवळील जटवाडा रोडलगतच्या दोन हेक्टर परिक्षेत्रात ६० हजार देशी वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
अत्यंत देखणे आणि तंत्रशुद्धपणे वड, पिंपळ, लिंब, आंबा, आवळा, गोरख इमली, बाभूळ, बोर यासह ५१ प्रजातींची फळझाडे तसेच विविध वृक्षांचा या घनदाट वनात समावेश आहे. खडकाळ जमीन असल्यामुळे झाडांना खाद्य, पाणी व्यवस्थित देता यावे त्यासाठी वनविभागाने कर्मचारी, पदाधिकारी यांची ड्युटी लावली आहे.
स्वतंत्र शेततळे
उन्हाळ्यात झाडांना पाणीपुरवठा वेळेवर व्हावा, त्यासाठी शेततळेदेखील येथे तयार केले आहे. झाडाजवळ ओलावा राहावा म्हणून भुसा, बाजरीचे पाचट याची मल्चिंग करणे सुरू आहे. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन होऊन झाडे जळणार नाही.दोन हेक्टरवरील ६० हजार झाडांसाठी ठिबक सिंचनाद्वारे पाणी दिले जाते. त्याचा फायदा झाडाच्या वाढीसाठी अधिक झालेला आहे.
चौकट
आमच्यावर सोपविलेली जबाबदारी आम्ही पार पाडली आहे. कुंपण करून झाडेझुडपं जनावरापासून सुरक्षित ठेवलेली आहेत. पशुपक्ष्यांच्या अधिवासासाठी घनदाट उद्यान उपयुक्त ठरणार आहे. वर्षभरानंतर हे उद्यान मनपाकडे सुपूर्द केले जाईल. वनविभागाचे मजूर व इतर कर्मचारी देखभालीकडे विशेष लक्ष ठेवून आहेत. आठ - नऊ महिन्यांत झाडाची उंची पाच फुटांपर्यंत येऊन पोहोचली आहे. वर्षभरात घनदाट वृक्ष मोहून घेतील. - शशिकांत तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी औरंगाबाद
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षलागवड व संवर्धन गरजेचे आहे.
शहरवासियांसाठी तलावाच्या काठी तयार झालेले डेन्स फॉरेस्ट पर्वणी ठरत आहे.
वर्षानंतर मनपाकडे सोपविणार...
(फोटो घ्यावेत)