फुटेज दाखविण्यास अधिष्ठातांचा नकार
By Admin | Updated: June 23, 2017 01:05 IST2017-06-23T01:02:09+5:302017-06-23T01:05:03+5:30
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागाच्या पायरीवरच महिलेची प्रसूती झाल्याप्रकरणी प्रशासनाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना क्लीन चीट दिली आहे.

फुटेज दाखविण्यास अधिष्ठातांचा नकार
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील अपघात विभागाच्या पायरीवरच महिलेची प्रसूती झाल्याप्रकरणी प्रशासनाने डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना क्लीन चीट दिली आहे. स्ट्रेचर आणि डॉक्टर काही मिनिटांतच हजर झाल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाल्याचे म्हणत एका दैनिकाच्या प्रतिनिधीला हे फुटेज दाखविल्याचा दावा करण्यात आला; परंतु ‘लोकमत’च्या प्रतिनिधीला हे फुटेज दाखविण्यास अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांनी नकार दिला. नियमानुसार हे फुटेज दाखविणे अशक्य असल्याचे अधिष्ठातांनी म्हटले.
घाटी रुग्णालयाच्या अपघात विभागासमोरील पायरीवर १५ जून रोजी पहाटे एका महिलेची प्रसूती झाली होती. पहाटे ४ वाजून ५ मिनिटांना सदर महिला प्रसूतीसाठी दाखल झाली होती. अवघ्या दोन मिनिटांत कळा वाढल्यामुळे ती अपघात विभागाच्या पायरीवरच बसली. त्यानंतर अवघ्या काही सेकंदांत अपघात विभागातील डॉक्टर तिच्यापाशी पोहोचले आणि ४ वाजून ८ मिनिटांनी त्या ठिकाणी स्ट्रेचर दाखल झाले. यानंतर ४ वाजून ११ मिनिटाला प्रसूती झाल्यानंतर महिला आणि बाळास वॉर्डात पाठविण्याचे प्रसारमाध्यमांना सांगण्यात आले. सीसीटीव्ही फुटेवरून हे चित्र स्पष्ट झाल्याचे सांगण्यात आले. सदर महिलेस वॉर्डात नेणे अशक्य होते.