महिलेसह दोन बालकांना डेंग्यू
By Admin | Updated: September 14, 2015 00:47 IST2015-09-14T00:47:36+5:302015-09-14T00:47:36+5:30
नळदुर्ग : शहरातील वसंतनगर, कारखाना परिसरातील एका महिलेसह दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर,

महिलेसह दोन बालकांना डेंग्यू
नळदुर्ग : शहरातील वसंतनगर, कारखाना परिसरातील एका महिलेसह दोन बालकांना डेंग्यूची लागण झाली असून, त्यांना उपचारासाठी सोलापूर, उमरगा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे़ डेंग्यूसारख्या आजाराची लागण झालेली असतानाही पालिकेने स्वच्छता मोहीम राबविण्याकडे व आरोग्य विभागाने आवश्यक त्या उपायोजना करण्याकडे दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे़
नळदुर्ग शहरातील वसंतनगर भागात मागील काही दिवसांपासून बालकांना मोठ्या प्रमाणात तापीची लागण होत आहे़ यातील बहुतांश रूग्ण हे खासगी रूग्णालयात उपचार घेत आहेत़ येथील आरोग्य केंद्रातील रिक्तपदांमुळे २५ हजार लोकवस्तीच्या नळदुर्ग शहराबरोबरच परिसरातील १४ गावांतील रूग्णांसह नातेवाईकांची वेळप्रसंगी मोठी गैरसोय होते़ ग्रामीण भागातील नागरिकांनाही खासगी रूग्णालयाचा रस्ता धरावा लागत आहे़
पालिका प्रशासनाकडून मागील काही महिन्यांपासून शहरासह परिसरातील नाल्यांमधील घाण काढण्यात आलेली नाही़ शिवाय किटकनाशकेही टाकण्यात आलेली नाहीत़ परिणामी शहरात ठिकठिकाणी अस्वच्छता निर्माण झाली आहे़ त्यातच वसंतनगर व परिसरातील बालकांना मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात तापीची लागण झाली आहे़
यातील एका महिलेसह दोन बालकांना डेंग्यूची लागण झाल्याचे समोर आले आहे़ त्या रूग्णांना तातडीने सोलापूर व उमरगा येथील रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़ डेंग्यूसारख्या गंभीर आजाराची लागण झालेली असतानाही अद्याप नगर पालिकेसह आरोग्य विभागाने आवश्यक ती पावले उचलली नसल्याने संताप व्यक्त होत आहे़ (वार्ताहर)