डेंग्यूची चाचणी होणार स्वस्त

By Admin | Updated: November 16, 2014 23:38 IST2014-11-16T23:26:58+5:302014-11-16T23:38:29+5:30

लातूर : डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या आजाराचे निदान करणाऱ्या चाचण्याही महागड्या आहेत.

Dengue testing is going to be cheaper | डेंग्यूची चाचणी होणार स्वस्त

डेंग्यूची चाचणी होणार स्वस्त



लातूर : डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या आजाराचे निदान करणाऱ्या चाचण्याही महागड्या आहेत. त्यामुळे मनपा आयुक्तांनी पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना विनंती करून चाचणी शुल्क कमी करण्याची विनंती केली होती. या विनंतीला मान देऊन असोसिएशनने चाचणी शुल्कात २० टक्के कपात केली आहे.
लातूर शहर व जिल्ह्यात डेंग्यू आजाराची मोठ्या प्रमाणात लागण होत आहे. दररोज २० ते २५ रुग्णांची डेंग्यू आजाराची चाचणी सध्या करण्यात येत आहे. यात कमीत कमी तीन ते पाच रुग्णांच्या चाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह येत आहे. महानगरपालिकेने डासोत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना सुरूच ठेवल्या आहेत. धूर फवारणी, अ‍ॅबेटिंग मोहीम राबविली जात आहे. तरीही एडिस इजिप्ती डासाचा उपद्रव सुरूच असल्याने रुग्णसंख्या वाढतच आहे. परंतु, सामान्य रुग्णांना या रोगाची चाचणी करण्यासाठी आर्थिक अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी बैठक घेतली. त्यानंतर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन चाचणी शुल्कात २० टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. १२०० ते १५०० रुपयांपर्यंत डेंग्यूची चाचणी करण्यात येत होती. आता ही चाचणी ८०० रुपयांत करण्याचा निर्णय असोसिएशनने घेतला आहे, अशी माहिती असोसिएशनचे सचिव डॉ. पद्माकर बर्दापूरकर, अध्यक्ष डॉ. सतीश हंडरगुळे यांनी सांगितले.
आयजीजी, आयजीएम आणि एमएस-१ या तीन प्रकारच्या चाचण्या डेंग्यू आजाराच्या निदानाबाबत केल्या जातात. यासाठी आता केवळ ८०० रुपये शुल्क आकारले जाईल. डेंग्यू रुग्णांची संख्या वाढत असल्याने सामाजिक बांधिलकी समजून असोसिएशनने शुल्कामध्ये २० टक्के कपात केली असल्याचे डॉ. हंडरगुळे व डॉ. बर्दापूरकर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
असोसिएशन अंतर्गत शहर व जिल्ह्यात १२ लॅब आहेत. या सर्व लॅबमधून डेंग्यूची चाचणी ८०० रुपयांत केली जाईल. डेंग्यू रुग्णांची मोजदाद करण्यासाठी या लॅबमधील अहवालाला प्रमाण मानले जात नाही.
४शासकीय लॅबमधून पॉझिटिव्ह अहवाल आल्यानंतरच त्याची मोजदाद होते. परंतु, उपचाराकामी येथील लॅबमध्ये केलेल्या टेस्टचा अहवाल ग्राह्य मानला जातो. त्यासाठी ही आर्थिक सूट देण्यात आली आहे. सध्या २० ते २५ पैकी कमीत कमी तीन रुग्णांचा अहवाल तरी डेंग्यू पॉझिटिव्ह येत असल्याचे पॅथॉलॉजिस्टचे म्हणणे आहे.
४मनपा व आरोग्य विभागाने डासोत्पत्ती रोखण्यासाठी उपाययोजना करूनही डेंग्यू रुग्णांची संख्या वाढतच आहे.
स्वच्छ पाण्यामुळेच डेंग्यूची लागण करणारा एडिस इजिप्ती डास तयार होते. त्यामुळे पाणीसाठे झाकून ठेवून त्याची काळजी घेणे आवश्यक आहे. शिवाय, सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या पाणीसाठ्यांवर डासोत्पत्ती होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी कोरडा दिवस पाळून डासोत्पत्ती रोखावी, असे आवाहनही पॅथॉलॉजिस्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आले.

Web Title: Dengue testing is going to be cheaper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.