डेंग्यूचा राजकीय ताप!
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:38:36+5:302014-08-02T01:43:12+5:30
औरंगाबाद : शहरात डेंग्यू व इतर साथरोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली असून, त्याचे वेगवेगळ्या पातळ्यांवर राजकारण सुरू झाले आहे.
डेंग्यूचा राजकीय ताप!
औरंगाबाद : शहरात डेंग्यू व इतर साथरोगांनी थैमान घालण्यास सुरुवात केली असून, त्याचे वेगवेगळ्या पातळ्यांवर राजकारण सुरू झाले आहे. एन-९ आणि एन-११ मध्ये डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण आढळले असल्यामुळे ‘मध्य’ विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुकांनी कधी नव्हे ते आज या निमित्ताने मतदाररूपी नागरिकांच्या भेटी घेऊन सतर्क असल्याचे दाखवून दिले.
महापौर कला ओझा, आ. प्रदीप जैस्वाल, नगरसेवक राजगौरव वानखेडे आदींसह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना डेंग्यूमुळे नागरिकांच्या संपर्कात येण्याची संधी मिळाली, तर मनसेचे सुमित खांबेकर, सतनामसिंग गुलाटी, संतोष पाटील, रवी गायकवाड यांनी प्रभाग ई आणि ब समोर जोरदार आंदोलन करून पालिकेवर निष्क्रियतेचे खापर फोडत दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली, तर दुसरीकडे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. अक्रम सय्यद अब्बास यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन डेंग्यू नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली.
चार वर्षे कुठे गेले होते?
दरवर्षी उन्हाळ संपण्याच्या आणि पावसाळा सुरू होण्याच्या तोंडावर साथरोग डोके वर काढतात. मागील चार वर्षांमध्ये डेंग्यूसदृश आजारामुळे अनेक जण दगावले. त्यावेळी नगरसेवक वगळता कुठलाही नेता, आमदार, इच्छुक नागरिकांच्या दारी गेल्याचे आठवत नाही. आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळी उठाठेव, पत्रकबाजीचे व आंदोलनाचे स्टंट सुरू असल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती.
आरोग्य विभागावरून गटबाजी
आरोग्य अधिकाऱ्यांवरून सेनेत दोन गट पडल्याची चर्चा आज होती. शिवसेनेच्या एका नेत्याच्या सांगण्यावरून डेंग्यूचे राजकारण सुरू करण्यात आल्याचीही चर्चा पालिकेत रंगत आहे. डॉ. टाकळीकर विरुद्ध डॉ. कुलकर्णी यातूनही कर्मचाऱ्यांत दोन गट पडल्याचे दिसते.
काँग्रेसचे निवेदन
काँगे्रसने आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डेंग्यू आजारापासून संरक्षणासाठी त्वरित नागरी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. कुचराई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अक्रम, विरोधी पक्षनेता रावसाहेब गायकवाड उपस्थित होते.
झटापटीत एक जखमी
सिडको प्रभाग कार्यालयात मनसे कार्यकर्ते शिरत असताना पोलिसांनी बळाचा वापर करीत कार्यालयाचे फाटक जोर लावून ढकलेले. त्यामध्ये मनसचे माजी शहराध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांच्या बोटांना इजा झाली. त्यामुळे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले, त्यांनी घोषणाबाजी केली.
मनपालाच डेंग्यू झाला
राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अभिजित देशमुख यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मनपालाच डेंग्यू झाला आहे.
यंत्रणा तोकडी पडल्यामुळे शहरात साथरोगांनी थैमान घातले आहे. जनजागृतीमध्ये मनपा कमी पडत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. डेंग्यूसदृश भागात तातडीने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे.