डेंग्यूचा अहवाल; खासगी डॉक्टरांची गोची

By Admin | Updated: July 23, 2014 00:40 IST2014-07-23T00:17:48+5:302014-07-23T00:40:36+5:30

मुजीब देवणीकर , औरंगाबाद शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही रुग्णांचा मृत्यूही होत असताना महापालिका डेंग्यू नसल्याचा दावा करीत आहे.

Dengue Report; Private doctor | डेंग्यूचा अहवाल; खासगी डॉक्टरांची गोची

डेंग्यूचा अहवाल; खासगी डॉक्टरांची गोची

मुजीब देवणीकर , औरंगाबाद
शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काही रुग्णांचा मृत्यूही होत असताना महापालिका डेंग्यू नसल्याचा दावा करीत आहे. खाजगी डॉक्टरांनी डेंग्यूच्या रुग्णांची माहिती मनपाला देणे बंधनकारक आहे. मात्र, महापालिका डेंग्यू असा स्पष्ट उल्लेख असल्याचा अहवाल पाठवू देत नाही. एखाद्या डॉक्टराने हा शहाणपणा केलाच तर मनपा अधिकारी चक्क त्याचे पोस्टमार्टेम करून मोकळे होतात.
या धक्कादायक प्रकाराची माहिती अशी की, ताप आल्यास शक्यतो सर्वसामान्य नागरिक आपल्या फॅमिली डॉक्टरकडे जाणे पसंत करतात. सध्या डेंग्यूची साथ असल्याने डॉक्टर रुग्णांची तपासणी करून उपचार सुरू करतात. चार ते पाच दिवस सतत ताप असलेल्या रुग्णांच्या रक्ताची चाचणी घेतली जाते. त्यात डेंग्यू असल्याचे निष्पन्नही होते. हा आजार डॉक्टर रेकॉर्डवर घेत नाही. ते फक्त डेंग्यसदृश आजार एवढाच उल्लेख कागदावर करतात.
रुग्णाच्या पेपरवर डेंग्यू असा उल्लेख केल्यास डॉक्टरांना त्याची संपूर्ण माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळविणे भाग असते. अनेक डॉक्टर प्रामाणिकपणे आरोग्य विभागाला अहवाल कळवितात; पण हाच प्रामाणिकपणा त्यांना नडतो. कारण एकीकडे महापालिका दावा करीत असते की, शहरात कुठेच डेंग्यूचे रुग्ण नाहीत. त्यात डॉक्टरांनी असा अहवाल पाठविला तर मनपाची अधिक पंचाईत होते. त्यापेक्षा डॉक्टरांनी अशा प्रकारचा अहवालच पाठवू नये, अशी ‘सोय’करण्यात येते.
शहरातील काही प्रामाणिक डॉक्टरांनी मनपाकडे डेंग्यूच्या रुग्णांचा अहवाल पाठविला. आता हे डॉक्टर बरेच कोंडीत सापडले आहेत. मनपाचे अधिकारी, कर्मचारी त्यांच्यासमोर नियमावलीच वाचून दाखवतात. तुमच्या दवाखान्याला तीन बाजूने सहा मीटर जागा सोडलेली नाही. अग्निशमन यंत्रणाच बसविलेली नाही. चार हजार लिटरची पाण्याची टाकी नाही, मग तुमच्या दवाखान्याची परवानगी रद्द करण्यास काय हरकत आहे. एखाद्या डॉक्टराने सर्व नियमांचे पालन केलेले असल्यास त्याला परवानगी नूतनीकरण करून हवी किंवा नको, असा गर्भित इशाराच देण्यात येतो.
या सर्व प्रकाराला कंटाळून शहरातील डॉक्टर डेंग्यूच्या भानगडीत पडत नाहीत. महापालिका म्हणेल तसे ते वागतात. प्रत्येक डॉक्टर डेंग्यूसदृश आजार म्हणून रुग्णांवर उपचार करीत आहेत.
रुग्णांची माहिती मनपाला कळविणे आवश्यक
शहरात गॅस्ट्रो, कावीळ, मलेरिया, डेंग्यू आदी कोणत्याही साथरोगाच्या रुग्णांची माहिती खाजगी डॉक्टरांनी मनपाला देणे बंधनकारक आहे.
मनपाला माहिती मिळाल्यावर रुग्णाच्या रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येतात. अहवाल येईपर्यंत रुग्ण बरा होतो किंवा....?
कोणत्याही साथरोगाचा प्रभाव दोन ते सात दिवसांपर्यंतच असतो. रुग्णाच्या प्रतिकारशक्तीवरही याचा प्रभाव बराच अवलंबून असतो.
डेंग्यू व इतर आजारांच्या रुग्णाने ताप आल्यावर साधी पॅरासिटेमॉल गोळी जरी खाल्ली तरी रक्त तपासणीत डेंग्यूचा अंश दिसून येत नाही.
तपासण्याचा तपशील
ताप जास्त असलेल्या एखाद्या रुग्णाला डेंग्यू आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घ्यावे लागतात. बाजारात गर्भ चाचणी घेतल्याप्रमाणे काही कंपन्यांचे कीट उपलब्ध झाले आहेत. क्षणार्धात रुग्णाला डेंग्यू आहे किंवा नाही याचे निदान होऊ शकते.
डेंग्यूच्या आजारपणात एनएस-१, आयजीएम आणि आयजीजी या तीन चाचण्या प्रामुख्याने घेण्यात येतात. या तपासण्या करण्यासाठी ८०० ते १२०० रुपयांपर्यंतचा खर्च येतो.
अनेक रुग्णांचे नातेवाईक म्हणतात, एवढ्या पैशांमध्ये तर रुग्णावर उपचार होतील. त्यापेक्षा टेस्ट न केलेली बरी. म्हणून डॉक्टर जी औषधे देतील त्यावर विसंबून असतात. ९० टक्के नागरिक डेंग्यूची तपासणी करण्यास नकार देतात, असे एका पॅथॉलॉजीतील तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.
शहरभर व्याप्ती
पंधरा दिवसांपूर्वी डेंग्यूचे रुग्ण सिडको-हडको आणि गारखेडा परिसरात मोठ्या प्रमाणात होते. आता डेंग्यूची व्याप्ती शहरभर पसरली असून, शहरातील वेगवेगळ्या भागातही डेंग्यूचे रुग्ण पाहायला मिळत आहेत.
१४ वर्षीय बालकाचा मृत्यू
डेंग्यूच्या आजाराने शहरात थैमान घातले असून, मंगळवारी हेडगेवार रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
सिडको एन-३ येथील बालाजी फड या १३ वर्षीय मुलास ताप आल्याने त्याला हेडगेवार हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
उपचार सुरू असताना आज त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळाल्यावर महापालिकेच्या आरोग्य विभागाचे एक पथक फड यांच्या सिडको एन-३ येथील निवासस्थानी पोहोचले. त्यांनी मृतदेह अंत्यसंस्कारासाठी जालना येथे नेल्याचे कळाले, अशी माहिती प्रभारी वैद्यकीय अधिकारी संध्या टाकळीकर, डॉ. राणे यांनी दिली.
दहशत कोणाची...
शहरातील काही खाजगी डॉक्टरांशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता अनेकांनी कानावर हात ठेवले.
महापालिकेच्या कारभाराबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही. आम्हाला जेवढे येते आणि कळते तेवढेच आम्ही करतो, असेही काही डॉक्टरांनी सांगितले.
एका पॅथॉलॉजी डॉक्टरनेही आपले नाव न छापण्याची विनंती केली. अखेर मनपाच्या आरोग्य विभागात कोणाची दहशत आहे.
मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे स्वत: डॉक्टर असूनही शहरातील आरोग्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.
सर्वसामान्य, गोरगरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळावी, हीच त्यांच्याकडून अपेक्षा.
३४ रुग्णांवर उपचार
शहरातील वेगवेगळ्या खाजगी रुग्णालयांमध्ये तब्बल ३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी महापालिकेच्या आरोग्य विभागातून मिळाली आहे. शहरात किमान २०० हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत. काही रुग्ण दवाखान्यांमध्ये अ‍ॅडमिट नाहीत; पण रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याचे बहुतांश खाजगी डॉक्टरांचे म्हणणे आहे.
डेंग्यूचे निदान होणे आवश्यक
एखाद्या रुग्णाला ताप आल्यानंतर त्याला डेंग्यू आहे किंवा नाही हे कळणे महत्त्वाचे आहे. जोपर्यंत रुग्णाला नेमका आजार काय हे कळत नाही, तोपर्यंत त्याच्यावर डेंग्यूसदृश आजार म्हणूनच उपचार होतात. या व्यतिरिक्त आपल्याला काहीच माहीत नसल्याचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ. संध्या टाकळीकर यांनी सांगितले.
आंतररुग्ण भरती केंद्र नाहीत
शहरात कोणताही साथरोग निर्माण झाल्यास यापूर्वी सहा ठिकाणी आंतररुग्ण भरती केंद्रे सुरू करण्यात येतात. डेंग्यूच्या रुग्णांसाठी मनपाने अजून तरी अशी व्यवस्था केलेली नाही. मनपाच्या वेगवेगळ्या केंद्रांवर डॉक्टर चार तास हजेरी लावून निघून जातात. लाखो रुपये खर्च करून मनपाने उभारलेली आरोग्य यंत्रणा कोणत्या कामाची, असा प्रश्न उपस्थित होत आहेत.
आरोग्य विभाग नावालाच
शहरात डेंग्यूचा झपाट्याने फैलाव होत असताना मनपा आरोग्य विभाग कोणत्याही प्रतिबंधात्मक उपाययोजना करायला तयार नाही. सर्वसामान्य गरीब रुग्णांना महापालिकेच्या २७ दवाखान्यांमध्ये गेल्यावर समाधानकारक उपचार मिळत नाहीत. डेंग्यूच्या रुग्णांना अ‍ॅडमिट करण्याची सोय कुठेच नाही. नाईलाजास्तव अनेक गरीब रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे धाव घेत आहेत.
वैद्यकीय संघटनेचे कानावर हात
कोणतीही वैद्यकीय संघटना डॉक्टरांचे प्रश्न सोडविण्यासाठी असते. डेंग्यूच्या आजाराबाबत ‘महापालिकेकडून होणारा त्रास’ या मुद्यावर एका वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, तुम्ही आम्हाला रीतसर पत्र द्या, त्यानंतर आम्ही उत्तर देऊ. खासगी डॉक्टरांनी आपली व्यथा संघटनेकडे लेखी स्वरूपात कधीच मांडली नाही.

Web Title: Dengue Report; Private doctor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.