डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
By Admin | Updated: September 13, 2014 00:35 IST2014-09-13T00:30:22+5:302014-09-13T00:35:21+5:30
शेख महेमूद तमीज, वाळूज महानगर बजाजनगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तिघांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले
शेख महेमूद तमीज, वाळूज महानगर
बजाजनगरातील स्वच्छतेकडे एमआयडीसी प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे डेंग्यूने पुन्हा डोके वर काढले असून, तिघांना डेंग्यूची लागण झाल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
बजाजनगरसह परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूसदृश व साथीच्या आजाराचे अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
अचानक ताप येऊन थंडी वाजणे, मळमळ व उलट्या होणे, हातपाय गळून पडणे, प्लेटलेटस्ची संख्या झपाट्याने कमी होणे आदी लक्षणे आढळत असल्यामुळे नागरिक भयभीत आहेत. बजाजनगरात एमआयडीसी प्रशासन खाजगी ठेकेदारामार्फत साफसफाईचे काम करीत असून ठेकेदार केवळ कागदोपत्री स्वच्छता करीत असल्याचा आरोप त्रस्त नागरिकांनी केला आहे.
मध्यंतरी बजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजाराचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. या सर्वेक्षणात १०० घरांपैकी किमान १० घरांत पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या होत्या. त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना पाण्यात टाकण्यासाठी अॅबेटचे वाटप केले होते.
डेंग्यू व साथीच्या आजारामुळे रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे एमआयडीसीने स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित केले होते. आता पुन्हा ‘जैसे थे’ अवस्था असून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्यामुळे तसेच सांडपाणीही उघड्यावरून वाहत असल्यामुळे साथीचे आजार पुन्हा बळावत आहेत.
विसर्जन विहिरीची सफार्ई कधी?
वाळूज महानगर परिसरातील अनेक गणेश मंडळांच्या तसेच घरगुती गणपतीचे बजाजनगरातील एमआयडीसीच्या विहिरीत विसर्जन करण्यात आले होते. अद्यापपर्यंत परिसर व विहिरीची साफसफाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचले असून दुर्गंधीमुळे आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या विहिरीत मोठ्या प्रमाणात निर्माल्य व मूर्ती टाकण्यात आल्यामुळे विहीर तुडुंब भरली आहे. अशातच या परिसरातील नागरिक केरकचराही या विहिरीत टाकतात. या परिसराची तसेच विहिरीची स्वच्छता करण्यासाठी एमआयडीसीकडे पाठपुरावा करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप डॉ. मनोज जैन, गिरीश दुगड, आर.एन. दुगड, सुरेखा सुरवसे, सुरेखा पायगव्हाण, प्रभावती पेटकर, मनीषा खंदारे, शिल्पा काटकर, हिराबाई मोते, सुनील इंगळे, ललिता सुकासे, ताराबाई देवकर, योगिता भोकरे, प्रेरणा भुरावत, सारिका भुरावत, कोमल बनकर आदींनी केला आहे.