‘त्या’ डेंग्यू रुग्णाचा मृत्यू

By Admin | Updated: July 27, 2014 01:18 IST2014-07-27T00:55:11+5:302014-07-27T01:18:59+5:30

वाळूज महानगर : बजाजनगरात संशयित डेंग्यू रुग्णाचा खाजगी रुग्णालयात २६ जुलै रोजी मृत्यू झाला.

'That' dengue patient's death | ‘त्या’ डेंग्यू रुग्णाचा मृत्यू

‘त्या’ डेंग्यू रुग्णाचा मृत्यू

वाळूज महानगर : बजाजनगरात संशयित डेंग्यू रुग्णाचा खाजगी रुग्णालयात २६ जुलै रोजी मृत्यू झाला. साथीच्या आजारांना रोखण्यासाठी आरोग्य विभाग, एमआयडीसी व स्थानिक ग्रामपंचायती स्वच्छतेकडे कानाडोळा करीत असल्याचे वृत्त गेल्या आठवड्यात ‘लोकमत’ने दिले होते.
बजाजनगरातील सह्याद्री हाऊसिंग सोसायटीतील विठ्ठल रमेश मगरे (२७) याला डेंग्यूची लागण झाल्याच्या संशयावरून बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची प्रकृती खालावल्यामुळे त्याला दोन दिवसांपूर्वी औरंगाबादेतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २६ जुलै रोजी विठ्ठल मगरे याचे निधन झाले. विठ्ठल मगरे हा टपरी चालवून उदरनिर्वाह करायचा. नुकतेच त्याचे लग्नही झाले होते. खासगी रुग्णालयाचे डॉ. पंकज बलदोटा यांनी विठ्ठल मगरे याला डेंग्यू झाल्याचे आणि पुढील उपचारासाठी शहरातील रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे सांगितले.
वाळूज महानगर परिसरातील बजाजनगर, वाळूज, पंढरपूर, रांजणगाव, वडगाव, जोगेश्वरी या परिसरात गेल्या महिनाभरापासून साथीचे आजार आहेत. डेंग्यूसदृश व साथीच्या आजारांचे अनेक रुग्ण बजाजनगरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. अचानक ताप व थंडी येणे, मळमळणे, उलट्या होणे, हातपाय गळणे, प्लेटलेटस्ची संख्या झपाट्याने कमी होणे आदी लक्षणे रुग्णात आढळतात. अस्वच्छता व दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत.
बजाजनगरात एमआयडीसी तर परिसरात स्थानिक ग्रामपंचायतीकडून नागरी सुविधा दिल्या जातात. मात्र, या परिसरात दूषित पाणी व अस्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष झाल्याचे जागोजागी दिसते. बजाजनगरात खाजगी ठेकेदारामार्फत साफसफाईचे काम करण्यात येते. एमआयडीसीचे अधिकारी व ठेकेदारात हातमिळवणीमुळे अनेक सेक्टरमध्ये कागदोपत्रीच स्वच्छता केल्याचे दिसते. गेल्या वर्षभरापासून बजाजनगरातील ड्रेनेजलाईनचे काम रखडल्यामुळे विविध सेक्टरमधील सेफ्टी टँक चोकप होऊन पाणी घरांसमोर व रस्त्यावर साचते. अनेक हॉटेलचालक शिळे अन्नपदार्थ उघड्यावर फेकून देत असल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असते. बजाजनगरातील सिमेन्स कॉलनी, कणकधारा सोसायटी, काबरा रेसिडेन्सी, श्री गणेशाय गृहनिर्माण संस्था, स्वाध्याय केंद्र परिसर, अयोध्यानगर, न्यू सह्याद्री सोसायटी, आर.एम. सेक्टर आदी ठिकाणी साथीच्या आजारांचे रुग्ण आढळले आहेत.
या रुग्णांवर बजाजनगरातील खाजगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग व एमआयडीसीच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य मंदा गाडेकर यांनी केला आहे.
आरोग्य विभागातर्फे जागृती
बजाजनगरात डेंग्यूसदृश व साथीच्या आजारांचे रुग्ण वाढल्याच्या तक्रारी आल्यामुळे आरोग्य विभागाने १४ जुलैपासून बजाजनगरमध्ये सर्वेक्षण सुरू केले आहे. या परिसरातील १०० घरांपैकी किमान १० घरांतील पाण्यात डेंग्यूच्या अळ्या आढळल्या आहेत. रोज ८ ते १० साथीचे रुग्ण आढळत असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
आपला परिसर स्वच्छ ठेवा, एक दिवस कोरडा दिन पाळा, अशा सूचना विभागाने केल्या आहेत. दोन दिवसांपासून २५ ते ३० कर्मचाऱ्यांचे पथक बजाजनगरात घरोघरी फिरून स्वच्छता व आरोग्याबद्दल जागृती करीत असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. यू.पी. गंडाळ व दौलताबाद प्रा. आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.बी. बामणे यांनी सांगितले.

Web Title: 'That' dengue patient's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.