नर्सीतही आढळला डेंग्यूचा रूग्ण
By Admin | Updated: September 13, 2014 00:10 IST2014-09-13T00:07:55+5:302014-09-13T00:10:06+5:30
नर्सी नामदेव : नर्सी नामदेव येथील मुलीस डेंग्यू, मलेरियासदृश्य आजार आहे.

नर्सीतही आढळला डेंग्यूचा रूग्ण
नर्सी नामदेव : हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव येथील अक्षदा सत्यवान गवते (वय ७) या मुलीस तीन दिवसांपासून ताप येत असल्याने रक्ताची तपासणी केली असता डेंग्यू, मलेरियासदृश्य आजार असल्याचे समजल्यावरून त्या मुलीस मेहकर येथील खासगी रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे.
नर्र्सी नामदेव येथे सर्वच घरी तापीचे रूग्ण आहेत. लहान बालकांना तापीचा त्रास होत आहे. गावात सर्वच घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे. डासांच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने धूरफवारणी करण्याची गरज आहे. डेंग्यूसदृश्य आजार झाल्याने गावात भीतीचे वातावरण आहे. उपचार सुरू असलेल्या मुलीची प्रकृती सध्या चांगली असल्याचे गवते यांनी सांगितले. वेळीच गावातील घाण दूर केल्यास उद्भवणाऱ्या आजारास टाळता येऊ शकतो. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. विलास गोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन नळयोजनेचा पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपची गळती, नळ पाईपलाईनसाठी खोदलेल्या खड्ड्यांकडे लक्ष देण्याच्या सूचनाही केल्या आहेत. तसेच दररोज पाणी शुद्धीकरण करण्यास सांगितले. गावात कोणासही ताप आल्यास घाबरून न जाता नर्सी नामदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधोपचार करून घ्यावा, असे आवाहनही डॉ. गोरे यांनी केले आहे. (वार्ताहर)