डेंग्यूचा कहर
By Admin | Updated: July 12, 2014 01:06 IST2014-07-12T01:06:14+5:302014-07-12T01:06:14+5:30
विकास राऊत, औरंगाबाद शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळा लागला आहे.
डेंग्यूचा कहर
विकास राऊत, औरंगाबाद
शहरात साथरोगांची लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. पावसाळा लागला आहे. कूलर, डबकी व साठवलेल्या स्वच्छ पाण्यातील डासांची पैदास वाढल्यामुळे तापाचे रुग्ण दवाखान्यांतून दिसून येत आहेत. मनपा दप्तरी तीन महिन्यांत ७२ डेंग्यूसदृश रुग्णांची नोंद झाली असून, शंभरीकडे रुग्णांचा आकडा जात आहे. यासाठी मनपाचा घनकचरा व्यवस्थापन, नालेसफाई करणारा विभाग, दूषित पाणीपुरवठा करणारी यंत्रणा जबाबदार आहे. आरोग्य विभागाकडे उपाययोजना करण्याची जबाबदारी असून अपुऱ्या साधनसामग्रीमुळे तो विभागही हताश झाल्याने डेंग्यूसारखे साथरोग शहरात बळावत आहेत.
शिवाजीनगर, मुकुंदवाडी, गुरुदत्तनगर, अरिहंतनगर, विवेकानंदनगर, श्रीनिकेतन कॉलनी, नाथनगर, नक्षत्रवाडी, अंबिकानगर, राजीव गांधीनगर, जयभवानीनगर, एन-५ साईनगर, न्यू हनुमाननगर, कटकटगेट, फाजलपूर, हर्षनगर, गांधीनगर, जाफरगेट, खोकडपुरा, गरमपाणी, नौबत दरवाजा या भागांत नाल्यांमुळे डासांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मनपाने नालेसफाई तातडीने करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. मनपा आरोग्य विभागाने नेहरूनगर, रहेमानिया कॉलनी, बेगमपुरा, शरीफ कॉलनी, जयभीमनगर, एन-११, मयूरनगर, नवनाथनगर, नवजीवन कॉलनी, बारी कॉलनी, विष्णूनगर, शिवशंकर कॉलनी, भानुदासनगर, बौद्धनगर, एकतानगर, वानखेडेनगर, मुकुंदवाडी, अंबिकानगर, बनेवाडी या भागांमध्ये डेंग्यूसदृश रुग्णांचे प्रमाण वाढल्यामुळे पाहणी केली आहे.
का होतो डेंग्यू...
शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे नागरिक चार ते पाच दिवस पाणी साठवून ठेवत आहेत. त्या पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. तो डास चावल्यामुळे साथरोगांचा प्रसार होतो आहे. शिवाय नालेसफाई, कचरासंकलन, दूषित पाण्यामुळेही साथरोगांचे प्रमाण वाढले आहे.
डासांमुळे होणारे आजार
डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुन गुनिया हे आजार होतात. अॅनाप्लेक्स डासामुळे हिवताप येतो. इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू व चिकुन गुनिया होतो. फ्युलेक्स हा डास चावल्यास हत्तीरोग होतो.
आजाराची लक्षणे
तीव्र ताप येणे, डोकेदुखी, मळमळ, उलटी, सांधे व अंगदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, क्वचित पुरळ येणे ही डेंग्यूची, तर थंडी वाजून येणे, सतत किंवा दिवसाआड ताप येणे, घाम येऊन अंग गार पडणे, डोके दुखणे, उलट्या होणे ही हिवतापाची लक्षणे आहेत.
...तर होतो डेंग्यू
एडिस इजिप्टाय हा डास चावल्यास डेंग्यू आजार होतो. हा डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतो. या डासांच्या पायांना पांढरा चकाकणारा रंग असतो. फक्त डेंग्यू व्हायरसने पीडित असलेला डास मानवाला चावल्यास डेंग्यूचा आजार होतो.
कशी घेणार काळजी
आठवड्यातून एकदा भांडी स्वच्छ धुऊन, कोरडी करून पाणी गाळून भरावे. स्वच्छ पाणी झाकून ठेवावे. डासविरोधी साधनांचा वापर करावा. घर स्वच्छ ठेवावे. परिसरात वाढलेले गवत, झुडपे कापून टाकावीत.
४३ हजार घरांच्या पाहणीचा दावा
१२६ अतिसंवेदनशील परिसरांची यादी आरोग्य विभागाने तयार केली आहे. त्यातील ४३ हजार ४३२ घरांची पाहणी केली आहे. १ लाख २८ हजार ३७० कंटेनर तपासले असता २१३ कंटेनरमध्ये डास अळ्या आढळून आल्या. १०१ रुग्णांचे नमुने प्रशासनाने घेतले आहेत.