डेंग्यूच्या आजाराने जिल्हाभरात धास्ती कायम
By Admin | Updated: November 10, 2014 01:16 IST2014-11-10T01:10:00+5:302014-11-10T01:16:37+5:30
जालना : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून डझनभर बळी गेल्यानंतर आता आरोग्य विभागाने तपासणी आणि जनजागरणाच्या कामाला सुरुवात केली आहे

डेंग्यूच्या आजाराने जिल्हाभरात धास्ती कायम
जालना : संपूर्ण जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असून डझनभर बळी गेल्यानंतर आता आरोग्य विभागाने तपासणी आणि जनजागरणाच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र जिल्ह्यात डेंग्यूविषयीची लोकांमधील धास्ती कायम असून भोकरदन, जाफराबाद, परतूर पाठोपाठ आता अंबड, घनसावंगी तालुक्यातही रुग्णांची संख्या वाढली आहे. बदनापूर, जालना, मंठा येथेही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून जिल्ह्यात डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत. सर्वप्रथम भोकरदन तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण आढळून आले. भोकरदन तालुक्यातील पद्मावती, अंबड तालुक्यातील घुंगर्डे हदगाव येथे अनुक्रमे दोन व तीन जणांचा डेंग्यूसदृश्य तापाने मृत्यू झाला. परतूर शहर,जळगाव सपकाळ येथे एका तरूणाचा मृत्यू झाला. नळणी, कोदोली, वालसावंगी, लेहा, बठाण इत्यादी ठिकाणीही डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण आढळून आले.
जिल्हा रुग्णालयात तापाचे रुग्ण दैनंदिन येत असले तरी डेंग्यूसदृश्य तापाच्या जवळपास शंभर रुग्णांवर आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात उपचार करणयात आला आहे. अंबड आणि घनसावंगी तालुक्यातही तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
भोकरदन शहरासह तालुक्यात पद्मावती, नळणी, कोदोली, वालसावंगी, जळगाव सपकाळ, वाकडी, इब्राहिमपूर या ठिकाणी डेंग्यूसदृश्य तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. बऱ्याच ठिकाणी पाण्याचे शुद्धीकरण होत नाही, हे वास्तव आहे. मात्र त्याचे गांभीर्य कुणालाच कसे नाही, असा संतप्त सवाल नागरिकांमधून विचारला जात आहे.
अंबड शहरासह तालुक्यात रोहिलागड, पारनेर, सोनक पिंपळगाव, हस्तपोखरी, शिरनेर, धनगरपिंप्री, सुखापुरी, लखमापुरी, गोंदी, वडीगोद्री, शहागड, महाकाळा, अंकुशनगर इत्यादी गावातही डेंग्यसदृश्य तापाचे रुग्ण आढळून येत आहेत.
घनसावंगी तालुक्यात तीर्थपुरी, कुंभारपिंपळगाव, मंगरूळ, भोगाव, पानेवाडी, राणीउंचेगाव, पारडगाव, रांजणी इत्यादी गावांमध्ये डेंग्यूसदृश्य तापाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे.
वडीगोद्री परिसरात रुग्णसेवा लवकर मिळत नसल्याचे चित्र आहे. आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण वाढत आहे.
संस्कृती तुकाराम वायाळ (वय ६) ही मुलगी डेंग्यूसदृश्य तापाने आजारी असून तिला औरंगाबाद येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. वडीगोद्री येथील केंद्रावर डॉक्टर हजर राहत नाहीत. याबाबत ग्रामस्थांकडून तक्रारी गेल्यानंतरही कोणतीही कार्यवाही होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
कुंभारपिंपळगाव परिसरात डेंग्यूसदृश्य तापाचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. दोन जणांना उपचारासाठी जालना येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे. गावात कचऱ्याचे ढीग, साचलेले पाणी वेळीच साफ करण्यात आलेले नाही. मागील महिन्यापासून गावात धूरफवारणी यंत्रणा बंद आहे. कुरैशी मोहल्ला, आझादनगर, झोपडपट्टी परिसरात रुग्णांची संख्या जास्त आहे. नाल्यांची सफाई झाले नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. डेंग्यूसदृश्य रूग्णांची संख्या वाढत असल्याचे डॉ. सूरज आर्दड यांनी सांगितले.
दरम्यान, ग्रामपंचायतीमार्फत साफसफाई मोहिम हाती घेण्यात आल्याचा दावा ग्रामविकास अधिकारी एस.एस. पवार यांनी केला आहे. तसेच आरोग्य विभागानेही घरोघर पिण्याच्या पाण्याची तपासणी करण्यात येत असल्याचा दावा केला.
अनेक गावांमध्ये रामभरोसे
ग्रामीण भागात तांडे, वाड्यांवर तर अस्वच्छतेने कहर केला आहे. नागरी सुविधा मिळत नाहीत. त्यामुळे साथीचे आजार वाढत असून त्याचा उद्रेक झाला आणि गाव प्रकाशझोतात आले की उपाय सुरू होतात. तोपर्यंत सगळे निमूटपणे सहन केले जाते. कुणीच गांभीर्याने घेत नसल्याने पंचायत समिती ग्रामपंचायतींना सूचना देत नाही. आरोग्य विभागही स्वत:हून जागृती करीत नाही. त्यामुळे नागरिक रामभरोसे जगत आहेत. (प्रतिनिधी)