औंढ्यातही डेंग्यूची भीती
By Admin | Updated: September 11, 2014 00:00 IST2014-09-10T23:49:54+5:302014-09-11T00:00:02+5:30
औंढा नागनाथ : डेंग्यूची साथ पसरल्याने खुद्द औरंगाबाद येथील आरोग्य सहसंचालक यांनी या गावांना भेटी देऊन साथरोग नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.

औंढ्यातही डेंग्यूची भीती
औंढा नागनाथ : तालुक्यातील पिंपळदरी, काकडदाभासह औंढा शहरात डेंग्यूची साथ पसरल्याने खुद्द औरंगाबाद येथील आरोग्य सहसंचालक यांनी या गावांना भेटी देऊन साथरोग नियंत्रित करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या. पिंपळदरी येथे पुन्हा नव्याने फेरसर्वेक्षण करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
पिंपळदरी येथे मागील १० दिवसांपासून डेंग्यूच्या तापाची साथ सुरू आहे. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी तालुका व जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने प्रयत्न करण्यात येत आहेत. परंतु स्थानिक आरोग्य कर्मचारी त्याला प्रतिसाद देत नसल्याने या ठिकाणची साथ आटोक्यात येत नव्हती. त्याचप्रमाणे औंढा व काकडदाभा या ठिकाणी डेंग्यूचा एक-एक रूग्ण आढळून आला होता. या संदर्भात ‘लोकमत’ ने वृत्त प्रसिद्ध करताच विभागीय आरोग्य सहसंचालक एस.व्ही. देशपांडे यांनी याची गंभीर दखल घेत थेट पिंपळदरी गाठले. दुपारी ४ वाजता त्यांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन गावात निर्माण झालेल्या साथीच्या सर्वेक्षण अहवालाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत साथरोग पर्यवेक्षक के.व्ही. घुगे, के.एस. शेळके, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गजानन चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड होते. यावेळी संचालक देशपांडे यांनी सोबत स्वतंत्र टिम आणली होती. त्यांनी गावामधील १० टक्के घरांचा सर्वेक्षण केला. यामध्ये आतून उपाययोजना करून पुर्नसर्वेक्षण करण्याची गरज असल्याने देशपांडे यांनी या ठिकाणी दुबार सर्वेक्षण करण्याचा सूचना हिवताप व तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्याच प्रमाणे साथीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. औंढा व काकडदाभा येथे बुधवारी सायंकाळी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच वसंत मुळे, ग्रामविकास अधिकारी रमेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली काही भागामध्ये धूर फवारणी करण्यात आली. गुरूवारी आरोग्य विभागाच्या वतीने ‘डोअर टू डोअर’ जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी गायकवाड व वैद्यकीय अधीक्षक डॉ. मंगेश टेहरे यांनी दिली.(वार्ताहर)