साताऱ्यात डेंग्यूचा फैलाव
By Admin | Updated: August 7, 2014 02:06 IST2014-08-07T00:54:23+5:302014-08-07T02:06:54+5:30
औरंगाबाद : सातारा गावात दोन दिवसांपूर्वी एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग जोमाने कामाला लागला आहे.

साताऱ्यात डेंग्यूचा फैलाव
औरंगाबाद : सातारा गावात दोन दिवसांपूर्वी एक डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग जोमाने कामाला लागला आहे. या परिसरात डेंग्यूने चांगलेच हातपाय पसरले असून अनेक जण तापेने फणफणले आहेत. ४५ घरांत डासांच्या अळ्या तपासणीत आढळून आल्याने खळबळ उडाली.
डेंग्यू रुग्ण आढळल्याने सातारा ग्रामपंचायतीने रक्ताचे नमुने, औषध फवारणी, उघडे पाण्याचे ड्रम, हौदात अॅबेट टाकण्यासाठी २४ कर्मचाऱ्यांची टीम तैनात केली आहे.
ग्रामपंचायतीच्या पथकांकडे असलेल्या छोट्या फॉगिंग मशीनद्वारे धूरफवारणीचे काम हाती घेतले असून, मोठी मशीन अद्यापही उपलब्ध झालेली नाही.
शहरासह सातारा भागातही डेंग्यूने डोके वर काढले असून, थंडी तापाची कणकण अनेकांत दिसत आहे. पाणी झाकून ठेवा, पाणी उकळून गाळून प्यावे, परिसरात पाण्याची गटारे साचू देऊ नका, असे आवाहन करून आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य व ग्रामपंचायतीचे कर्मचारी झपाटून कामाला लागले आहेत. औषध फवारणीचे ग्रामपंचायतीचे फॉगिंग मशीन पुणे येथे दुरुस्तीसाठी घेऊन गेले असून, अद्याप ते यंत्र आलेले नाही. ते आल्यावर सातारा परिसरातही डास निर्मूलनासाठी औषध फवारणीचे काम हाती घेण्यात येणार आहे.
सातारा आरोग्य उपकेंद्रात सुपरवायझर आर.टी. निकम, सिस्टर के. एस. वडमारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, ग्रामपंचायत व आरोग्य विभागाचे २४ कर्मचारी विविध वॉर्डात औषध फवारणी, पाण्याचे व रक्ताचे नमुने घेत असून, त्यांना ४५ ठिकाणच्या पाण्यात डासांची अंडी आढळून आली आहे. ८ ते १० नागरिकांना थंडीताप असल्याचे निदर्शनास आले आहे.
तपासणी सुरू
पथकाने प्रत्येक घरातील पाण्याचे नमुने तसेच रक्ताचे नमुने तपासले असून, ४१९ घरांतील २,७३३ महिला व पुरुष, मुलांची तपासणी केली असता १० जणांना थंडीताप आढळून आला, तर ४५ ठिकाणच्या पाण्यात डासांची अंडी आढळून आली.
४सातारा येथील ग्रामविकास अधिकारी बी. टी. साळवे म्हणाले की, परिस्थिती आटोक्यात असून, अॅबेट औषध पाण्यात टाकत असून जनजागृतीचे काम हाती घेतले आहे.