डेंग्यूचे २४, गॅस्ट्रोचे ३४ रुग्ण आढळले
By Admin | Updated: July 17, 2016 00:34 IST2016-07-17T00:29:38+5:302016-07-17T00:34:16+5:30
औरंगाबाद : पावसाळा सुरू होताच शहरातील विविध वसाहतींमध्ये डेंग्यू आणि गॅस्ट्रोने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे.

डेंग्यूचे २४, गॅस्ट्रोचे ३४ रुग्ण आढळले
औरंगाबाद : पावसाळा सुरू होताच शहरातील विविध वसाहतींमध्ये डेंग्यू आणि गॅस्ट्रोने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. मनपाचा आरोग्य विभाग कोणत्याच उपाययोजना करीत नसल्याची ओरड नगरसेवकांकडून करण्यात येत होती. आरोग्य विभागाने विविध वसाहतींमध्ये औषध फवारणी, अॅबेट ट्रीटमेंट व्यापक प्रमाणात सुरू केली. एकीकडे उपाययोजना जोरात सुरू असतानाही डेंग्यू आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांमध्ये वाढच होत आहे.
मनपाच्या आरोग्य विभागाने शहरातील २१६ वसाहतींमध्ये डेंग्यू, गॅस्ट्रो आदी रुग्ण आढळून येऊ शकतात यादृष्टीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. अतिजोखमीच्या भागात धूरफवारणी, पाणी साठविण्याचे हौद, टाक्यांमध्ये अॅबेट औषधी टाकणे आदी उपाययोजना सुरू केल्या आहेत. घाटी, खाजगी दवाखान्यांमध्ये रुग्णांची संख्या वाढत आहे. यासंदर्भात आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी सांगितले की, शहरात १ जुलैपासून आतापर्यंत डेंग्यूचे २४ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर यापूर्वीच ८ जणांना डेंग्यूचे निदान झाले होते. त्यामुळे मलेरिया विभागाच्या कर्मचाऱ्यांमार्फत फवारणीचे काम करण्यात येत आहे. धूरफवारणीसाठी ३ ट्रॅक्टर, २ वाहने असून, धूरफवारणीचा दररोजचा अहवाल घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली. गेल्या महिन्यात कॉलऱ्याचे ४ रुग्ण आढळून आले होते. गॅस्टोच्या ३४ रुग्णांनी घाटीत उपचार घेतल्याचे डॉ. जगताप यांची सांगितले.
शहरात डेंग्यू नियंत्रणात यावा म्हणून मोहीम राबविण्यात येत असून, शनिवारी रोजाबाग, भारतनगर, स्वामी विवेकानंदनगर आदी भागात उपाययोजना करण्यात आल्या. स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले यांच्या हस्ते मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेविका सीमा खरात यांची उपस्थिती होती.