दानवेंमुळे मानेंची अडचण वाढली
By Admin | Updated: August 2, 2014 01:43 IST2014-08-02T01:33:57+5:302014-08-02T01:43:45+5:30
लालखाँ पठाण, गंगापूर गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवारात रस्सीखेच वाढत असल्याने प्रमुख दावेदार माजी आ. अण्णासाहेब माने अडचणीत सापडले आहेत.

दानवेंमुळे मानेंची अडचण वाढली
लालखाँ पठाण, गंगापूर
गंगापूर-खुलताबाद विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवारात रस्सीखेच वाढत असल्याने प्रमुख दावेदार माजी आ. अण्णासाहेब माने अडचणीत सापडले आहेत.
गंगापूर विधानसभा मतदारसंघासाठी शिवसेनेतर्फे नवीन चेहऱ्याला संधी मिळणार. नव्या चेहऱ्याच्या शोधात असतानाच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांचे नाव शिवसेनेच्याच सक्रिय गोटातून पुढे येत असल्याने माने यांना तालुक्यातूनच समर्थन मिळत नसल्याने ते एकाकी पडल्याचे पदाधिकाऱ्यांतून बोलले जात आहे.
तर लोकसभा निवडणुकीत देशात भाजपाची सत्ता आल्यामुळे आणि आतापर्यंत तालुक्यात शिवसेनेचाच उमेदवार लादल्याने भाजपा कार्यकर्त्यांचा नुसता वापर झाल्याची भावना भाजपा गोटात आहे. त्यामुळे या खेपेला भाजपाही निवडणूक रिंगणात उतरून तिकिटावर आपला हक्क सांगणार आहे. उमेदवारी मिळावी याकरिता भाजपाचे नेते किशोर धनायत तालुक्यात दौरे करून चाचपणी करताना दिसत आहे.
गंगापूर-खुलताबाद तालुक्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. मतदारही शिवसेनेला अनुकूल आहेत; परंतु माने यांच्या कार्यपद्धतीवर शिवसेनेत मोठी नाराजी आहे अनेकजण उघडपणे ही नाराजी बोलून दाखविताना आढळून येत असून माने यांना उमेदवारी दिल्यास जरा जडच जाईल अशी चर्चा आहे. या ठिकाणी शिवसेनेतर्फे नवीन चेहरा दिला तरच विजयाची खात्री शिवसैनिकांतून घेतली जाते.
तालुक्यात शिवसेनेची भरभक्कम फळी आहे. शिवाय मजबूत संघटन व मतदारांचा बदलत असलेला कल पाहून आता औरंगाबाद शहरासह तालुक्यातील नवख्या शिवसैनिकांनीही उमेदवारीवर हक्क बजावण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे संघटनेच्या प्रमुख नेत्यांनीच सर्वांना मागे टाकीत आपणच उमेदवारी घेणार असा पवित्रा घेतला आहे. शिवसेनेची उमेदवारी आपल्याच खिशात असल्याचा देखावा करण्यात अंबादास दानवेंनी आघाडी घेतली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवसेना संघटनेचे जुने नवे हितचिंतक, सर्वच समर्थकांची मोट बांधून दानवे आपला आमदारकीचा रस्ता मोकळा करून माने यांना साफ करणार असल्याचे चित्र आता तालुक्यात उभे राहिले असून, यामुळे माने यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे.