महाराष्ट्र भाजप आमदार आणि विधान परिषद सदस्य संजय केणेकर यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर करण्याची मागणी केली. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधण्याची विनंती करेन, असेही संजय केणेकर म्हणाले आहेत.
पत्रकारांशी बोलताना संजय केणेकर म्हणाले की, "खुलताबादचे ऐतिहासिक नाव रत्नापूर होते. परंतु, औरंगजेबाने हे नाव बदलून खुलदाबाद असे केले. जेव्हा मी खुलताबादला जातो आणि तिथे औरंगजेबाचे नाव पाहतो, तेव्हा माझे रक्त खवळते. त्यामुळेच खुलताबादचे नाव बदलून रत्नापूर असे करण्याची आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी स्मारक बांधण्याची मागणी करत आहोत.
"छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे भोसले, संभाजी महाराज आणि त्यांचे साथीदार संताजी घोरपडे, दादाजी जाधव आणि ताराबाई राणी यांसारख्या वीरांनी औरंगजेबाविरुद्ध हिंदवी स्वराज्यासाठी लढा दिला. परंतु, काँग्रेसने त्यांचा इतिहास लपवण्याचे काम केले. आता भाजप हा इतिहास उघड करण्यासाठी आणि औरंगजेबाच्या विचारांना गाडण्यासाठी कटिबद्ध आहे. ग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांसारख्या वीरांच्या गौरवशाली गाथा दडपण्याचा प्रयत्न केला, असाही त्यांनी आरोप केला.
खुलताबादमधील औरंगजेबाच्या थडग्यावरून वाद पेटल्याच्या पार्श्वभूमीवर ही मागणी करण्यात आली. याआधी शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनीही खुलताबादचे नाव रत्नापूर करण्याचा प्रस्ताव मांडला. हे ठिकाण मूळचे रत्नापूर म्हणून ओळखले जात होते आणि औरंगजेबाच्या आगमनानंतर त्याचे नाव बदलण्यात आले, असे त्यांनी म्हटले होते.