लघु उद्योजकांना उद्योगासाठी भूखंड देण्याची मागणी
By Admin | Updated: August 2, 2014 01:44 IST2014-08-02T01:28:53+5:302014-08-02T01:44:15+5:30
वाळूज महानगर : उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने आजपासून बजाजनगरात भीक मांगो आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
लघु उद्योजकांना उद्योगासाठी भूखंड देण्याची मागणी
वाळूज महानगर : उद्योगासाठी भूखंड उपलब्ध करून देण्यास एमआयडीसी प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने आजपासून बजाजनगरात भीक मांगो आंदोलन सुरू करण्यात आले आहे. तृतीय पंथियांकडून भीक मागून एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचा निषेध करण्यात आला.
वाळूज व शेंद्रा औद्योगिक वसाहतीत गेल्या अनेक वर्षांपासून लघु व सूक्ष्म उद्योजकांनी कर्ज काढून तसेच उधारी-उसनवारी करून भाड्याचे शेड घेऊन उद्योग सुरू केले आहेत. भाड्याच्या शेडमध्ये उद्योग सुरू असल्यामुळे या लघु उद्योजकांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेडमालकांकडून सुविधा मिळत नसल्यामुळे, तसेच सतत भाडेवाढीचा तगादा सुरूअसल्यामुळे लघु उद्योजक त्रस्त झाले
आहेत. स्वत:च्या जागेत उद्योग सुरू करण्यासाठी एमआयडीसीने भूखंड उपलब्ध करून द्यावेत, यासाठी उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने गेल्या अनेक दिवसांपासून एमआयडीसी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू केला आहे. यासाठी मोर्चा, धरणे, निदर्शने, मुंडण इत्यादी आंदोलने या लघु उद्योजकांनी केली आहेत. मात्र, त्यांना भूखंड देण्यास एमआयडीसी प्रशासन टोलवाटोलवी करीत असल्यामुळे या लघु उद्योजकांत असंतोषाचे वातावरण आहे. मध्यंतरी एमआयडीसी प्रशासनाने या उद्योजकांना भूखंड देण्यासाठी सहमती दर्शविली होती. त्यानुसार जवळपास २०० लघु उद्योजकांनी भूखंडासाठी एमआयडीसीकडे प्रस्ताव दाखल केले होते. प्रस्ताव दाखल करण्यासाठी या उद्योजकांनी प्रकल्प अहवाल, नकाशा, डीडी आदींसाठी पदरमोड करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव एमआयडीसीकडे सादर केले होते. मात्र, भूखंड देण्याऐवजी या लघु उद्योजकांना शेड भाड्याने देणाऱ्यांचा छळ एमआयडीसीने चालविल्याचा आरोप उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.
शिवराई पथनाक्यावर आज आंदोलन
लघु उद्योजकांना हक्काचे भूखंड उपलब्ध करून द्यावेत, यासाठी सतत पाठपुरावा सुरू करूनही एमआयडीसी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज १ आॅगस्टपासून उद्योग क्रांती उद्योजक संघाच्या वतीने बेमुदत भीक मांगो आंदोलन सुरूकरण्यात आले
आहे.
भीक मागण्यासाठी तृतीय पंथीयांची मदत घेण्यात आली असून, आज बजाजनगरात या लघु उद्योजकांनी तृतीय पंथीयांना सोबत घेऊन भीक मांगो आंदोलन सुरू केले आहे.
उद्या २ आॅगस्ट रोजी शिवराई पथकर नाक्यावर भीक मांगो आंदोलन करण्यात येणार असल्याचे उद्योग क्रांती उद्योजक संघाचे अध्यक्ष सुरेश फुलारे, चंद्रशेखर शिंदे, भारत डमाळे, गोपाळराव देशमुख, जाधव यांनी सांगितले.